कल्याण दि. १६ ऑगस्ट : उरण येथील यशश्री शिंदे असो, शिळफाटा येथील अक्षता म्हात्रे असो की कोलकत्तामधील डॉ. मौमिका देबनाथ या या तिन्ही महिलांवरील बलात्कार आणि त्यांच्या हत्येच्या घटनेचे सगळीकडेच संताप व्यक्त होत आहे. सामान्य नागरिकांमधील याच संतापाचे पडसाद आज कल्याणाताही उमटलेले पाहायला मिळाले असून या बलात्काऱ्यांना निर्वस्त्र करून भर चौकात फाशी देण्याची मागणी करण्यात आली.
समाजातील या अमानवी अत्याचाराच्या घटनांविरोधात “कल्याणकारी कल्याणकर” या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून सामान्य कल्याणकर एकत्र आले आणि कल्याणच्या साई चौकात आज सायंकाळी कँडल प्रोटेस्ट करत वाढत्या बलात्काराच्या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
आधी महाराष्ट्राच्या उरण, शिळफाटा आणि आता कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येने संपूर्ण देशभर संताप व्यक्त होत आहे. कोलकत्ता येथील डॉक्टरच्या घटनेनंतर तर सामान्य नागरिकांमधील या विषयीचा रोष विविध रूपांनी बाहेर पडू लागला आहे. कल्याणात आज झालेले हे आंदोलन म्हणजे त्याचेच एक द्योतक समजावे लागेल. ज्यामध्ये कल्याणातील अनेक महिला भगिनी, डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक, सामजिक कार्यकर्ते आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अशा घटना करणाऱ्या बलात्कारी लोकांना अजिबात पाठीशी घालू नये, सरकारने अशी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या नराधमाना भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी. त्यासोबतच अशा घटनांमध्ये त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींनाही कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी संतप्त मागणी कल्याणकारी कल्याणकर सामाजिक उपक्रमाच्या डॉ. प्रशांत पाटील यांनी केली. त्यासोबतच पोर्नोग्राफी वेबसाईट आणि तत्सम कंटेंट दाखवणाऱ्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने लगेचच बंदी घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान या कँडल प्रोटेस्टसाठी उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांनी यावेळी दोन मिनिटांचे मौन पाळून या अत्याचारपिडीत महिलांना श्रद्धांजलीही वाहिली.