मुंबई : विश्वचषक टी-20 सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात रणसंग्राम रंगणार आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा याकडे खिळल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे भारत वर्ल्डकपमध्ये (वनडे आणि टी -20) पाकिस्तानकडून पराभूत झाला नाही. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.
भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवार, 24 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येतील. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. सामन्याची नाणेफेक सायंकाळी 7 वाजता होणार आहे. आजच्या भारत विरूध्द पाकिस्तान सामन्याची चर्चा प्रत्येक शहारात आणि गावागावात रंगली आहे. त्यासाठी विशेष स्क्रीनही लावण्यात येणार आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह वाढला असून भारत जिंकण्याचा विश्वास व्यक्त हेात आहे. भारताच्या विजयासाठी नागरिकांकडून देशभरातील मंदिरात होम हवन व प्रार्थना सुरू आहे.
भारत आणि पाकिस्तानचे संबंध कधीही फार चांगले नव्हते आणि त्याचा परिणाम दोन्ही देशांच्या खेळांवरही नेहमीच पाहायला मिळतो. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचं मत भारतानं कायम व्यक्त केलं आहे. त्यामुळं दोन्ही देशांमध्ये शत्रूत्वाची भावनाही असते. त्यामुळे आजच्या सामन्यांकडे सर्वाँच लक्ष वेधले आहे.