मुंबई, दि. ३०ः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक मुंबईतील ट्रायडेंट हॉटेलमध्ये पार पडली या बैठकीत वंचित बहुजन आघाडीसह सीपीआय, शेतकरी कामगार पक्ष, वंचित बहूजन आघाडी, जनता दल युनायडेट, समाजवादी पार्टी आदी मित्रपक्षांचा समावेश झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणखीन मजबूत झाली आहे अशी माहिती बैठकीनंतर शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपची वाट धरली आहे तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि आप ने स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे एकिकडे इंडीया आघाडीला धक्का बसला असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकसंध राखण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून (ठाकरे) प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांची महत्वाची बैठक पार पडली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शिवसेनेचे (ठाकरे) संजय राऊत आणि विनायक राऊत या बैठकीला उपस्थित होतो.
या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली. तसेच अनेक निर्णय घेण्यात आले. तसेच महाविकास आघाडीत शेतकरी कामगार पक्ष, जनता दल युनायडेट, सीपीआयएम, सीपीआय, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, या नवीन मित्रांचा समावेश झाला आहे. या सगळ्या प्रमुख नेत्यांशी सकारात्मक आणि महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. महाविकास आघाडी आता अधिक मजबुतीने पुढे जाते आहे. नवीन मित्रांची आम्हाला भक्कम साथ मिळाली आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना बैठक सुरू होऊन दीड तास ताटकळत ठेवीत दुय्यम स्वरुपाची वागणूक दिल्याचा आरोप वंचितचे प्रवक्ते धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला होता. संजय राऊत यांनी तो फेटाळून लावला. हे वृत्त तथ्यहीन आहे. काहीतरी गैरसमज परसवला जातो आहे. वंचितने तीन प्रमुख नेते आंबेडकर यांनी पाठवले होते. सकाळपासून चर्चेत होते, असे सांगत त्यांचा दिनक्रमही राऊत यांनी सांगितला. अतिशय चांगल्या प्रकारे आणि सकारात्मक चर्चा झाली. महाविकास आघाडीत सामावून घेतल्याचे पत्र वंचितला हवे होते. ते सुध्दा दिले आहे. येत्या २ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत, असे राऊत यांनी सांगितले. तसेच आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असा दावा त्यांनी केला.