लंडन : लंडनमधील स्पेसव्हीआयपी ही लक्झरी स्पेस ट्रॅव्हल कंपनी पुढच्या वर्षीपासून हाय-टेक बलूनद्वारे ६ तासांची अवकाश सफर सुरू करणार आहे. या सफरीदरम्यान आकाशात पर्यटकांना शाही भोजनाचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी कंपनीने अल्केमिस्ट या मायकलिन स्टार्ड रेस्टॉरंटमधून रॅसमस मंक या डॅनिश शेफची नियुक्ती केली आहे. सहा पर्यटकांना बलूनद्वारे आकाशात समुद्रसपाटीपासून १ लाख फूट म्हणजेच ३० किलोमीटर उंचीवर नेण्यात येईल. इथे त्यांना पृथ्वीच्या क्षितिजावर होणारा सूर्योदय अनुभवताना रॅसमस मंक यांनी बनवलेल्या स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेता येईल. बलूनमधील वायफायच्या माध्यमातून पर्यटकांना पृथ्वीवर मित्रांशी संपर्कही साधता येईल.प्रवासाप्रमाणेच जेवणाचा मेन्यूदेखील नाविन्यपूर्ण असेल. मात्र, यासाठी ५ लाख डॉलर्स म्हणजे ४ कोटी रुपये मोजावे लागणार आहते. भविष्यात जास्तीत जास्त लोकांना या सफरीचा आनंद घेता यावा म्हणून अधिकाधिक सफारी आयोजित करून किंमत कमी करण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल, शेफ रॅसमस मंक यांनी सांगितले.