ठाणे : लोकसभेनंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पदवीधर मतदारांच्या प्रश्नावर कुणीही बोलण्यास तयार नाही. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातील मतदारांचे प्रश्न समजावेत आणि त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी अपक्ष उमेदवार गोकुळ रामजी पाटील यांनी स्वतंत्र ॲप तयार केले आहे.
गोकुळ पाटील हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. गेली २९ वर्ष ते ज्ञानदानाचे कार्य करत होते. ज्ञानदानाचे कार्य करत असताना शिक्षकांच्या पदवीधरांच्या समस्या त्यांनी समजून घेत सोडविल्या. यापुढेही ते समस्या सोडवत राहणार आहेत. अजूनही बऱ्याच समस्या जैसे थे आहेत. त्या विद्यमान आमदारांकडून सोडवल्या गेल्या नाहीत. शिक्षकांच्या व पदवीधरांच्या न्याय हक्काकरीता त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाटील यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मतदारांच्या सोयीसाठी त्यांनी ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे मतदारांना आपले नाव सहजरित्या शोधणे सोपे होणार आहे. तसेच मतदान केंद्राचा पत्ता, यादी क्रमांकाविषयी इत्यभूत माहिती मतदारांना मिळणार आहे. या ॲपमध्ये उमेदवाराची संपूर्ण माहिती https://politicalicons.in/gokulpatil येथे एका क्लिकवर मिळणार आहे.
गेल्या काही वर्षात पाटील यांनी शिक्षकांचे पगार तातडीने मिळावेत, निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना सवलत मिळावी, पदोन्नतीसाठी लढा, शाळांना अनुदान मिळावे, यासाठी बेमुदत उपोषणही केले आहे. सरकारला जागे करण्याकरीता शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी अनेकदा रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलनही केली आहेत. कोरोना सर्वेक्षणाच्या कामातून शिक्षकांची मुक्तता व्हावी, यासाठी त्यांनी मोठा लढा दिला. त्याचे फलित म्हणजे शिक्षकांची अखेर या कामातून मुक्तता झाली. शिक्षकांना हक्काचा माणूस मिळावा, यासाठी पदवीधरांचा आमदार शिक्षक असावा, अशी मागणी पदवीधर शिक्षकांकडून वाढल्याने समस्या सोडविण्याचे आश्वासन पाटील हे मतदारांना देत आहेत.