मुंबई, दि 15 : महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे रोजगार देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. राज्य कृषि, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक एकवर राहील हा आमचा विश्वास आहे. त्यासाठी आपण सर्वजण शपथबध्द होऊया आणि प्रयत्नशील राहूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय प्रांगणात ध्वजारोहण झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर,माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज, भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे मुंबई येथील प्रमुख अधिकारी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी,मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीर,शहीद यांना वंदन केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे.या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे असेही ते म्हणाले. समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता यावा यासाठी गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे. तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत असा शासनाचा मानस असून स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात झालं पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो जबाबदारी. ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची.केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची, प्रगतीची गंगा वाहावी यासाठी गेले वर्षभर काम करता आले.याचा विशेष आनंद आजच्या स्वातंत्र्यदिनी आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय, असे ते म्हणाले. शासनाने वर्षभरात घेतलेल्या महत्त्वाच्या निणर्याची मुख्यमंत्रयांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!