धर्मा पाटील मृत्युप्रकरण, राज्य सरकार आरोपीच्या पिंज-यात

मुंबई : धुळे जिल्हयातील ८४ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्युनंतर विरोधकांसह मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही  फडणवीस सरकारला चांगलच धारेवर धरलय. ही आत्महत्या नाही तर हत्याच आहे याला सरकारच जबाबदार असल्याने सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने केली असून, धर्मा पाटील मृत्युप्रकरणात  राज्य सरकारला आरोपीच्या पिंज-यात उभं केलय.

२२ जानेवारीला धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्रशान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर जे जे रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. धर्मा पाटील यांच्या मृत्युचे खापर विरोधकांनी सरकारवर फोडलय. मात्र सरकारमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही भाजपला दोषी ठरवलय. सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाना साधलाय. धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून, तो सरकारी अनास्थेने घेतलेला बळी आहे. त्यामुळे त्यांना वेळीच न्याय का मिळाला नाही, याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरूद्ध ३०२ दाखल करा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.  पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या सांगण्यावरुनच धर्मा पाटील यांच्या जमिनीबाबतची मिटिंग रद्द झाली असल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. विधान परिषदेचे विरोधी पक्षेनते धनंजय मुंडे यांनी  हा सरकारच्या क्रुरतेचा बळी असून,  सरकारने केलेली हत्याच .असल्याची टीका केलीय. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारने धर्मा पाटील यांची ही एक प्रकारे हत्या केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे अस ट्विटरवरुन टीका केलीय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी ही सरकारी हत्या असल्याची टीका केली असून  सरकारविरोधात 302 चा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी करणारे ट्वीट्ट केलय.

काय आहे प्रकरण?
धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यात रहिवाशी. धुळे जिल्ह्यात होणाऱ्या औष्णिक वीज प्रकल्पात त्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र पाच एकराच्या बदल्यात त्यांना केवळ चार लाख रुपये भरपाई देण्यात आली. धर्मा पाटील यांच्या चार एकर जमिनीत आंब्याची 600 झाडं होती. विहीर, ठिबक सिंचन आणि वीज अशी बागायती शेती असलेल्या धर्मा पाटील यांना केवळ 4 लाखांचा मोबदला देण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत भरपाई कमी मिळाल्याबाबत धर्मा पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरु केला. मात्र, त्यांना अधिकारी आणि संबंधित मंत्रालयाकडून योग्य उत्तरं मिळत नसल्याने त्यांनी विषप्राशन केलं.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *