मुंबई : सोशल माध्यमातून कोणत्याही आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा होत नाही. आम्ही कधीही केली नाही आणि करत सुध्दा नाही, असा खोचक टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना लगावला. वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी त्यावर विचार करावा, असेही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत सोशल मिडियातून जागा वाटप केली जाते, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. त्यावरच बोलताना राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना हा टोला लगावला
राऊत म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. कोणी ही कोणाला पाडणार नाही. पाडापाडीचे भूत कोणाच्या मानगुटीवर का बसले आहे, ते आम्हाला माहीत नाही. भाजपला आणि हुकुमशाहीला पराभव हाच एकमेव महाविकास आघाडीचा उद्देश आहे. आंबेडकर यांच्या बहुजन आघाडीसमोर चार जागांचा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे. त्यांनी दिलेल्या २७ जागांमधीलच या चार जागा आहेत. त्या जागांबाबत वंचितच्या नेत्यांनी भूमिका मांडावी. त्यांच्या निर्णयानंतर जागा वाटपावर अंतिम निर्णय घेतला जाईल. परंतु, समाज माध्यम, ट्विटर किंवा फेसबूक आदी सोशल माध्यमातून कोणत्याही आघाडीच्या जागावाटपाची चर्चा होत नाही. आम्ही कधी केली नाही आणि करत सुध्दा नाही, असे राऊत म्हणाले.