एक राखी जवानांसाठी माजी नगरसेवक मंदार हळबे यांचा अनोखा उपक्रम

डोंबिवली (प्रतिनिधी) – भारतीय सैनिक देशांच्या सीमांचे संरक्षण करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सीमेवर पहारा देत असतात. त्यांचं आणि आपलं नातं सुरक्षेच्या बंधनात अतूट बांधण्यासाठी, ते आणखी घट्ट करण्यासाठी डोंबिवलीतील माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी धागा धागा अखंड विनूया…एक राखी जवानांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

गुजरातमधील भूज येथील सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी पहारा देणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या वीर जवानांसाठी एक राखी पाठवा असे आवाहन त्यांनी केले होते. डोंबिवलीकरांनी या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. हजाराहून अधिक राख्या मंदार हळबे यांच्या कार्यालयात जमा झाल्या आहेत. येत्या 15 ऑगस्टला भुज येथे लाडक्या बहिणींनी भावासाठी पाठविलेल्या या राख्या वीर जवानांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत.

भाजपचे माजी नगरसेवक मंदार हळबे यांच्यासह एकलव्य आर्ट फोरम कथ्थक नृत्य कला संस्था आणि श्री मुद्रा कलानिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी गुजरात येथील भूजच्या सीमेवर भारतीय जवानांसाठी हा विशेष कार्यक्रम आयोजिला गेला आहे.

या कार्यक्रमात एकलव्य आर्ट फोरम कथ्थक नृत्य कला संस्था आणि श्री मुद्रा कलानिकेतनच्या विद्यार्थीनी आपली नृत्यकला सादर करुन देशभक्ती आणि रक्षाबंधनवर आधारित नृत्याचा कलाविष्कार दाखवणार असल्याची माहिती श्री मुद्रा कलानिकेतन च्या वृषाली दाबके यांनी दिली.
रक्षाबंधन हा सण जवळ आला असून सीमेवर तैनात जवानांप्रती प्रत्येक भगिनीच्या मनात एक वेगळी भावना असते. सैन्यदलातील या बंधुरायांना प्रत्यक्ष जाऊन त्याच्या हातावर राखी बांधणे हे प्रत्येक भगिनींचे स्वप्न असते. हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी हळबे यांनी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबविला. यामार्फत डोंबिवलीकरांना जवानांसाठी राखी पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या आवाहनाला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून त्यात पोलीस दलातील महिला जवान यांनीही याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. सुमारे हजाराहून अधिक राख्या या अवघ्या दोन दिवसांत जमा झाल्या आहेत. केवळ डोंबिवलीतीलच नाही तर ठाणे, मुलूंड येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमात सहभागी होत जवानांसाठी राख्या पाठविल्या आहेत. भारत मातेच्या जयघोषात वीर जवानांसाठी प्रार्थना करत या राख्या भूज येथे रवाना करण्यात आल्या आहेत.
या सर्व पाठविण्यात आलेल्या राख्या एकत्र जमा करण्यात आल्या असून त्या येत्या 15 ऑगस्टला भूज येथे प्रत्यक्षात नेऊन त्या जवानांच्या हातावर बांधल्या जाणार आहेत.

एक राखी महिला पोलिसांची जवानांसाठी

शहरात राहत असलेला तुमच्या आमच्यासाठी सुरक्षेचा कवच असणारे पोलीस बंधू भगिनी, तर दुसरीकडे सीमेवर तैनात राहून तुमच्या आमच्या जीवाची काळजी घेणारे सैन्य दलातील जवान यांच्यातील एक अतूट नात्याचा बंधन अर्थात राखी पौर्णिमा. सैन्य दलातील या जवानांसाठी डोंबिवलीतल्या महिला पोलीस भगिनींनी ही राखी पाठविली आहे. एक राखी जवानांसाठी या उपक्रमात त्यांनी सहभाग नोंदवून ‘धागा धागा अखंड विनूया’ असे म्हणत पोलिस आणि जवानांमधील या भावा बहिणीच्या नात्याची विन ही विनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *