डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील गरिबाचा वाडा/कुंभारखाणपाडा परिसरात रविवारी रात्रीच्या दोघा भावांनी चाकू आणि तलवारीद्वारे दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून या भावांनी तक्रारदाराला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मधे पडलेल्या एकावर वार झाल्याने मध्यस्थी करणारा हा तरूण थोडक्यात बचावला आहे. विष्णूनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
या हल्ल्यात नरेश सुकदेव म्हात्रे (36, रा. साई सुकदेव चाळ, सरोवर नगर) हे जखमी झाले आहेत. नरेश यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि कलम 307, 506, 34 अन्वये चेतन (30) आणि त्याचा मोठा भाऊ सागर लालजी शर्मा (32) गुन्हा दाखल केला आहे.
चेतन व त्याचा भाऊ सागर शर्मा या दोघांचा दीपक महाजन याच्याशी चार दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यावेळी शर्मा बंधूंच्या विरोधात दीपक याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या रागातून रविवारी रात्री साडेअकरा वाजता हातात चाकू व तलवार घेऊन रस्त्यावर आलेल्या चेतन आणि सागर यांनी दहशत माजवली. तेथे जमलेल्या रहिवाशांना तलवार दाखवून तुम्ही मधे आला तर तुम्हाला पण जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्यानंतर जमलेल्यांनी भीतीने पळ काढला. शर्मा बंधूंनी दीपक महाजन याला आताच खल्लास करतो, अशी धमकी दिली. चेतन शर्मा याने त्याच्याकडील चाकू दीपकवर उगारला. हे पाहून नरेश यांनी मधे पडून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. सागर शर्मा याने नरेश यांनाही तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सागर शर्मा याने त्याच्याकडील छोट्या तलवारीने नरेश यांच्यावर वार केले. वार चुकविण्यासाठी डावा हात पुढे केला असता नरेश यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दोघा हल्लेखोर भावांनी तेथून पळ काढला. जखमी नरेश यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पोलिसांनी शोध घेऊन चेतन याला ताब्यात घेतले. फौजदार अनिल शिणकर या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.