डी. के. जैन यांनी मुख्य सचिव पदाचा स्वीकारला पदभार !
कृषिक्षेत्राच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखणार- जैन 
मुंबई :  राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी त्यांचा पदाची सुत्रे सुपूर्द केली. कृषी क्षेत्रातील उत्पादन दुप्पट करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असून राज्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. राज्यातील प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाईल, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या जातील, असे नवनियुक्त मुख्य सचिव  जैन यांनी यावेळी सांगितले.
*मुख्य सचिव जैन यांचा अल्पपरिचय असा* 
२५ जानेवारी,१९५९ रोजी जन्मलेले .जैन हे मुळचे जयपूर, राजस्थान येथील आहेत. एम.टेक. मॅकॅनिकल इंजिनिअर, एम.बी.ए. असे त्यांचे शिक्षण झाले आहे. राज्य शासनाच्या प्रशासनात त्यांनी आतापर्यंत महत्वाच्या पदांवर काम केले असून, त्यांची पहिली पदस्थापना १९८४ मध्ये धुळे येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर १९८५ मध्ये नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी,१९८७ मध्ये उपायुक्त, विक्रीकर, १९९० मध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९९२ मध्ये अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर येथे ते कार्यरत होते. १९९२ मध्ये सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९९५ मध्ये केंद्र शासनाच्या सेवेत त्यांची नियुक्ती झाली. २००२ मध्ये नियोजन विभागाचे सचिव म्हणून काम पाहिले.
 यु.एन.आय.डी.ओ. नवी दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यक्रम संचालक म्हणून २००२ मध्ये त्यांची नियुक्ती झाली. पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी विविध ऑटोमोबाईल्स कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले, मॅन्युअल्स लिहिली. कारखान्यांमध्ये उत्पादन करतानाच उत्पादित माल योग्य प्रकारे कसा होईल, यादृष्टीने काम केले.२००७ मध्ये राज्य शासनाच्या ग्राम विकास आणि जलसंधारण विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. २००८ ते २०११ या कार्यकाळात केंद्र शासनात पंचायत राज मंत्रालयाचे सह सचिव म्हणून त्यांनी काम केले.जैन यांनी नरेगा-मध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यांच्या कामाची दखल अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी घेतली होती आणि ओबामा यांनी.जैन यांना यासंदर्भात निमंत्रण देवून त्यांना चर्चेसाठी बोलाविले होते.
२०१५ मध्ये राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर कृषी व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. दिनांक २९ एप्रिल,२०१६ पासून ते वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहात होते.उत्तम प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेले जैन यांना ट्रेकींग आणि वाचनाची आवड आहे.
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *