इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण संस्कृती मंच आणि अनंत वझे संगीत, कला क्रीडा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
डोंबिवली : सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले, जगदीश चव्हाण, सायली महाडिक यांनी गायलेली अवीट गोडीची गाणी आणि त्यावर कथ्थक नृत्यांगना आदिती भागवत यांनी सादर केलेले अप्रतिम नृत्य आणि त्यासोबतीला ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडीलकर यांच्या अमोघ वाणीतील सात्विक निवेदन. अशा अमृततुल्य क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आज कल्याणकरांना लाभले, निमित्त होते ते इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण संस्कृती मंच आणि अनंत वझे संगीत, कला क्रीडा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे ,मुख्य उद्यान अधीक्षक तथा माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव , विद्युत कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत , डॉ प्रशांत पाटील
आदी उपस्थित होते.
कथ्थक नृत्यांगना अदिती भागवत यांच्या अतिशय सुंदर अशा शिववंदना नृत्याने या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि त्यानंतर मग सादर झालेल्या एकाहून एक सरस अशा सप्तसुरांच्या सुरेल, अवीट मैफिलीत कल्याणकर नागरिक भारावून गेले. सायली महाडिकने आपल्या अतिशय कोमल स्वरांत सादर केलेली ज्योती कलश छलके, नैनो में बदरा छाये, आली माझ्या घरी ही दिवाळी, आदिती भागवत यांच्या नृत्याची साथ लाभलेले मोहे रंग दे लाल या गाण्यांनी तर जगदीश चव्हाणच्या अवघे गर्जे पंढरपूर या अभंगासह ए जिंदगी गले लगा ले, या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली.