ठाणे : सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे व टाटा कॅपिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हिलचेअर, वॉकर, कुबडी ,इत्यादी व्यायामाचे साहित्य वितरीत करण्यात आले. यावेळी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे व शिक्षण समितीप्रमुख वसंत लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी सरचिटणीस राजू पातेरे, उपाध्यक्ष शंकर काळभोर, सल्लागार विठ्ठल खेरटकर, हरिश्चंद्र मालुसरे, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, खजिनदार विजय पवार, चिटणीस अविकांत साळंखे उपस्थित होते.
ठाण्यातील सेवाभावी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ही संस्था गेली 45 वर्षे सुधागड तालुक्यातील ठाणे, मुंबई आणि पुणे येथे राहणार्या रहिवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असून टाटा कॅपिटलच्या माध्यमातील तालुक्यतील अनेक शाळांना शैक्षणिक साहित्याबरोबरच खेळांचेही साहित्य पुरवत आहे. तसेच शाळांतील शौचालयांची दुरुस्ती, नवीन नळांचे कनेक्शन, पाण्याची टाकी आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यांत आल्या आहेत. तसेच गेली 5 वर्षांपासून तडखरकर अभ्यासमाला, होमी भाभा विज्ञान, सामाान्यज्ञान अभ्यासक्रम परिक्षेसाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून तत्सम पुस्तकेही देण्यात येत आहेत. 2 वर्षांपासून सैनिकी शिक्षणासाठी मुलांना सातारा येथील मिलिटरी स्कुलमध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण करीता पाठविण्यात येत आहे.
यंदाच्या दिवाळीपूवीच सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाला ठाणे संस्थेला शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांतील भरीव योगदानासाठी इनकम टॅक्स सूट साठी 80G प्राप्त झाली असून कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे हे फलित असल्याचे मत संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या दिवाळी मेळाव्यात अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी मांडले आहे.