ठाणे : ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदी देवेश पुरुषोत्तम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व खासदार रामदास तडस यांच्या मार्गदर्शनाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. देवेश पुरुषोत्तम पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सदस्यपद भूषविले आहे. त्यांचे सामाजिक व क्रीडा क्षेत्रात महत्वाचे योगदान आहे. त्यांनी अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असून, जिल्ह्यातील विविध गुणवंत खेळाडूंना साह्य केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील कुस्तीच्या प्रगतीसाठी त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धूरा सोपविण्याचा निर्णय संघाने घेतला. त्यानुसार संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे, हिंदकेसरी व सचिव योगेश दोडके यांनी देवेश पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी ठाणे शहर तालीम संघाचे सचिव रमाकांत पाटील, अंकुश वळखंडे, माजी क्रीडा अधिकारी राजेश भगत आदी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात कुस्तीच्या स्पर्धा भरविण्याबरोबरच होतकरू खेळाडूंना साह्य केले जाईल. राज्यात ठाणे जिल्ह्याचा स्वतंत्र ठसा उमटविण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त अध्यक्ष देवेश पाटील यांनी व्यक्त केली.