सीताफळ प्रक्रिया उद्योगाला ‘नोगा’च्या माध्यमातून चालना द्या
– कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर

मुंबई : सीताफळावर प्रक्रिया करून त्याचे ‘नोगा’ब्रॅण्डच्या माध्यमातून विक्री करण्यात यावी अशी सुचना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी मंत्रालयात कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक केली.
‘नोगा’ (Nagpur Orange Growers Association) च्या माध्यमातून टोमॅटो, संत्रा आदींवर प्रक्रिया करून रस, पल्प या उत्पादनांची विक्री केली जाते. राज्यात सीताफळाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे. आईस्क्रीम उद्योग क्षेत्रातून सिताफळाच्या पल्पला मोठी मागणी असते. ही गरज लक्षात घेता ‘नोगा’ने खासगी प्रक्रिया उद्योजकांच्या सहकार्यातून सीताफळावरील प्रक्रिया झालेल्या मालाचे विक्री करावे. यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. सीताफळ प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी याकरिता उत्पादक शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि खरेदीदार यांची साखळी तयार करण्यासाठी ‘नोगा’ने पुढाकार घ्यावा, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. ‘नोगा’च्या माध्यमातून देवगड आंबा उत्पादक संघासोबत करार करण्यात येणार असून, त्याद्वारे हापूस आंब्याचा पल्प उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. गवती चहापासून तेल तयार करून त्याचा वापर फिनाईल तसेच स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमध्ये केला जातो. त्यामुळे गवती चहाच्या कच्च्या मालाला मोठी मागणी आहे. हे पाहता राज्यातील शेतकऱ्यांना गवती चहा लागवडीसाठी प्रोत्साहीत करावे. त्यांच्या मालाची खरेदी होईल, अशी शाश्वती मिळाल्यास शेतकरी गवती चहाच्या लागवडीकडे वळतील, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले. कृषी औद्योगिक विकास महामंडळामार्फत सेंद्रीय खते, कीटकनाशकांची निर्मिती करण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यावेळी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक करंजकर यांनी सादरीकरण केले. कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार, आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!