दीड कोटीच्या बीलासाठी कंत्राटदाराचे कुटूंबासह १६ महिन्यांपासून आझाद मैदानात उपोषण 

मुंबई : परभणी येथील रस्त्याच्या केलेल्या कामाच्या दीड कोटीच्या बीलासाठी झगडत असतानाच, पीडब्लूडी अधिका-यांकडून झालेल्या त्रासामुळे एका कंत्राटदाराला घरदार विकून पत्नी, मुलांसह रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. राजू चिन्नप्पा हुलगुंडे असे त्या कंत्राटदाराचे नाव आहे. पीडब्लूडी अधिका-यांच्या त्रासामुळे सुखी संसाराची राखरांगोळी झाली असून, विवाहीत मुलगीही गमवावी लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून कंत्राटदार राजू हुलगुंडे आपल्या पत्नी, लहान मुलासह  मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. ठाकरे सरकार गेलं आणि शिंदे फडणवीस सरकार आलं, मात्र अजूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेब, आम्हाला न्याय द्या.. अशी कळकळीची विनंती हुलगुंडे कुटूंबिय करीत आहेत. 

नांदेड येथे राहणारे कंत्राटदार राजू चन्नाप्पा हुलगुंडे यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत परभरणी जिल्हयातील पूर्णा तालुक्यातील ताडकळस ते पुर्णा या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे.  त्या कामाचे त्यांना १४ लाख ५५ हजार ८५७ रूपये प्राप्त झाले, मात्र उर्वरित बिलाची रक्कम १ कोटी ५६ लाख रूपये अद्यापर्यंत त्यांना मिळालेली नाही. सदर रकमेचे बील रेकॉर्ड करण्यासाठी पीडब्लूडी अधिकारी  टक्केवारीची २० लाख रूपये रक्कम आगाऊ मागत आहेत. रस्त्याचे काम मिळावे यासाठी त्यांनी मुलीचे दागिने विकून पीडब्लूडी अधिका-यांना आगाऊ १० लाख रूपये दिले हेाते. अधिका-यांच्या त्रासामुळे आम्ही घरदार गहाण ठेवून दागिने विकून काम केलं.  आता २० लाख कुठून देणार ? असे सवाल राजू यांनी केला. आम्हाला न्याय हवाय  अशी मागणी ते करीत आहेत. नांदेड येथे उपोषण केल्याने त्यांना अमानुष मारहाण झाल्यानंतर हुलगुंडे यांनी न्यायासाठी मुंबई मंत्रालयाकडे धाव घेतली. काही महिन्यांपूर्वी  त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मंत्रालयासमोर  आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता.पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे आत्महत्येचा प्रयत्न अयशस्वी ठरला.  २५ ऑक्टोबर २०२१ पासून हुलगुंडे कुटूंबाने आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. तब्बल १६ महिने होऊनही हुलगुंडे कुटूंबिय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.  

परभणी अधिका-यांकडून अमानुष मारहाण, २० लाख रूपये दिले तरच बील रेकॉर्ड करू … 

 नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागासमोर कंत्राटदार राजू हुलगुंडे यांनी उपोषण केले होते. मात्र रात्रीच्यावेळी त्या दांम्पत्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. परभणी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता खुशाल देवीदास पाडेवार
मुख्य अभियंता पांढरे, कनिष्ठ अभियंता संजय बाबुराव देवडे, उपकार्यकारी अभियंता सोनवणे उपअभियंता बिराजदार, कनिष्ठ अभियंता फुलपगार, पांचाळ यांच्यासह  आणखी तिघेजण अशांनी मारहाण केल्याचे आरोप राजू यांनी केला. पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी त्यांचे नाव नंबर लिहून घेतले, सकाळी बोलवतो असे सांगितले. पण आमची तक्रार लिहूनही घेतली नाही. उलट पोलिसांनी आम्हाला दमदाटी करून हाकलून लावले असे राजू यांनी सांगितले. बील रेकॉर्ड करण्यासाठी धातकर साहेबांनी कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे यांना बील रेकॉर्ड करण्यासाठी सांगितले, त्यांनी होकार दर्शविला. पण धोंडगे यांनी आम्हाला भेटही दिली नाही. २० लाख रूपये दिले तरच बील रेकॉर्ड करू अशी मागणी अधिका-यांनी केल्याचे राजू यांनी सांगितले. त्यामुळे न्यायासाठी आम्ही उपोषणला बसलो. परंतु अधिका-यांनी अमानुषपणे मारहाण करून आम्हाला हाकलून लावले. पोलिसांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे न्यायासाठी आम्ही मुंबईला आलो, घरदार, दागिने विकले, पैसे गेले, लेकरू गेलं… आम्हाला न्याय हवाय असे राजू यांनी डोळयातील अश्रूं पुसत सांगितले. 

मंत्रालय आमच्या खिशात, तत्कालीन मंत्र्यांचा आदेश जुमानला नाही

हुलगुंडे यांनी न्यायासाठी तत्कालीन सार्वजनिक मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी चव्हाण यांनी संबधित अधिका-यांना चांगलेच झापले. गरीबाचे बील देऊन टाका असा सज्जड दम अधिका-यांना भरला होता. मात्र काही दिवसातच ठाकरे सरकार गेल्याने अधिका-यांनी त्यांचा आदेशही पाळला नाही. तू मंत्रालयात जा, अन्यथा कुठे जा, मंत्रालय आमच्या खिशात आहे, असा परभरणीच्या अधिका-यांनी दम भरल्याचे राजू यांनी सांगितले. आम्हाला मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट घ्यायची आहे, पण भेट होत नाही, ते आम्हाला न्याय देतील अशी आशा हुलगुंडे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!