मुख्यमंत्रयाच्या लोकशाही दिनात 20 अर्जांवर कार्यवाही
कल्याणच्या तक्रारीवरही निर्णय
मुंबई : मंत्रालयात आज झालेल्या ऑनलाईन लोकशाही दिनी नागरिकांच्या विविध विभागांशी निगडित २० तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ निर्णय घेतले. यामध्ये कल्याणातील तक्रारीचाही समावेश आहे.
आजच्या लोकशाही दिनात सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग,नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग, उद्योग विभाग, वन विभाग, जलसंपदा विभाग आदी विभागांशी संबंधित पुणे, ठाणे, लातूर, मुंबई, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, अहमदनगर, यवतमाळ या जिल्ह्यांतील तक्रारींचा समावेश होता.
कल्याणच्या रहिवाशी असलेल्या श्रीमती रोहिणी काशिनाथ जोगळेकर यांच्या अर्जावर त्यांना गाळा तात्काळ हस्तांतरीत करुन देण्याची कार्यवाही पणन विभागाने करावी. तसेच या प्रकरणात काही अतिक्रमण असल्यास पोलीस विभागाने ते तात्काळ काढून घ्यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. पतीचा व्यवसाय अधिकृतरित्या चालू ठेवण्यासाठी त्यांनी लोकशाही दिनात तक्रार अर्ज केला होता. आत्तापर्यंतच्या लोकशाही दिनात १४०१ तक्रारींपैकी १३९१ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित १० आणि आजच्या लोकशाही दिनात स्वीकृत करण्यात आलेल्या १० अशा २० तक्रारींवर आज निर्णय घेण्यात आला. या लोकशाही दिनास सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी अपर मुख्य सचिव आर. ए. प्रधान, पोलिस महासंचालक सतीश माथूर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास (1) प्रधान सचिव नितीन करीर, नगरविकास (2) प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर- सिंह, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय सेठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अपर आयुक्त संजय मुखर्जी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.