मुंबई :– मुंबईकरांच्या आरोग्यासाठी,मुंबई च्या स्वच्छतेसाठी, सुंदरतेसाठी सुरु असलेली स्वच्छ्तेची चळवळ ही महापालिका कर्मचारी, अधिकारी यांच्यापुरती मर्यादित न ठेवता ही लोक चळवळ होण्यासाठी प्रत्येक मुंबईकरांचा सहभाग यात आवश्यक आहे. मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी, मुंबई पालिकेचे सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत असतात, त्यांच्यामुळेच मुंबई, स्वच्छ आणि सुंदर असून स्वच्छता कर्मचारी हे ‘खरे हिरो’ असल्याची कौतुकाची थाप सफाई कर्मचा-यांना देत त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार संपूर्ण स्वच्छता मोहीम (डीप क्लिन ड्राईव्ह) हाती घेतली आहे. दि.3 डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या मोहिमेचा धारावीमधून शुभारंभ झाल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
जुहू चौपाटी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी समुद्र किनारा स्वच्छ करणारे यंत्र स्वतः चालवून स्वच्छतेची पाहणी केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार अमित साटम, माजी मंत्री दिपक सावंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल उपस्थित होते