Shahpur अविनाश उबाळे : शहापूर तालुक्यातील वासिंद शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येथील हॉटेल फूड मॅक्स ते हॉटेल चक्रधारीपर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. तात्काळ खड्डे बुजवून या रस्त्याचे नूतनीकरण करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी व्यापारी मंडळाचे कार्यकर्ते व वासिंद ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
मात्र वासिंद बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या संपूर्ण काँक्रीटीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पत्रव्पायवहार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु हे काँक्रीट रस्त्याचे काम निश्चित कधी सुरू होणार हे सांगितले जात नसल्याने अभियंत्यांच्या या बेबनाव व सरकारी अनास्थामुळे वासिंदकरांना खड्डेमय त्रास सहन करीत नवीन काँक्रीट रस्त्याची मात्र प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
शहापूर तालुक्यातील वासिंद शहर हे औद्योगिक,शैक्षणिक व नागरिकरणाच्या दृष्टीने मध्यवर्ती समजले जात असून पंचक्रोशीतील ४० गावांना येथील मुख्य बाजारपेठेचा एकमेव पर्याय असल्याने येथे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते.त्यामुळे पडलेले खड्डे व खराब रस्त्यांनी प्रवास करताना नागरिकांना रोज प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक व वाहनचालक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.शहरातील रस्त्याववरील खड्ड्यांमुळे झालेली दुर्दशा पाहून काही महिन्यांपूर्वी स्थानिक वासिंदच्या जागृत तरुणांनी पुढाकार घेत स्वतः घमेली व फावडा हातात घेत श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे भरले होते.
मात्र पुन्हा पावसामुळे रस्त्यावर खड्डे जैसे ते निर्माण झाले.रस्त्याची दैनावस्था होऊनही खड्डे भरणे व त्याची डागडुजी करण्याकडे शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.परिणामी वासिंद बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांची खड्ड्यांमुळे दैन्यावस्था झाले झाल्याने मोठमोठे खड्डे रस्त्यावर पडल्याने येथे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या खड्ड्यांमुळे रस्त्यातून प्रवास करताना वाहन चालक व नागरिकांना रोज भयंकर त्रास सहन करावा लागत आहे.खड्ड्यांमधून दुचाकी चालवताना अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याच्या घटनाही येथे घडत आहेत.
वासिंद व्यापारी मंडळांने बांधकाम उपविभागाच्या उपाभियंतांना लेखी निवेदन देऊन तात्काळ वासिंद शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची डागडूजी करावी असे लेखी निवेदन दिले आहे.
मात्र या रस्त्याचे नव्याने नूतनीकरण होणार असून काँक्रीट रस्त्याचा तसा नवा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांना आम्ही सादर केल्याचे सांगून रस्त्याची डागडुजी करता येणार नाही असे सांगून शहापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता बळवंत कांबळे हे आपली जबाबदारी झटकून लोकांची दिशाभूल करुन बोलवण करीत आहेत.
असा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची वेळीच डागडुजी झाली नाही तर वासिंदकरांच्या असंतोषाचा सामना सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांना करावा लागेल असे एकंदरीत चित्र वासिंद शहरात दिसत आहे.
मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला दोन्ही बाजूंनी जोडणाऱ्या वासिंद बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या संपूर्ण काँक्रीटीकरणासाठी सा. बां. विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. -बळवंत कांबळे उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहापूर