उघडयावर शौचालयास जाल, तर दंड भरा : ५७६ व्यक्तींकडून ५७ हजार दंड वसूल
गुड मॉर्निंग पथकाची नजर
मुंबई : उघडयावर शौचालयाला जाणा-यांवर व्यक्तींवर मुंबई महापालिकेच्या ‘गुड मॉर्निग’ पथकांद्वारे दंड आकारणी करण्यात येते. गेल्या १५ दिवसांत ‘गुड मॉर्निग’ पथकांद्वारे ५७६ व्यक्तिंकडून ५७ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे आता अशा व्यक्तींवर गुड मॉर्निंग पथकाची नजर राहणार आहे.
महापालिका क्षेत्र हे हागणदारी पासून मुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. मात्र हे स्थान कायम राहण्यासाठी महापालिकेकडून ३६ ‘गुड मॉर्निग’ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात ५ कर्मचा-यांचा समावेश आहे. यामध्ये कनिष्ठ आवेक्षक, मुकादम, क्लीनअप मार्शल, कामगार इत्यादी मनपा कर्मचारी आहेत. यानुसार ३६ पथकांमध्ये एकूण १८० कर्मचारी कार्यरत आहेत. पथकाकडून पहाटे ५.३० पासून हागणदारी मुक्तीसाठी प्रबोधनात्मक व दंडात्मक कार्यवाही केली जात आहे. ज्या भागात उघड्यावरील हागणदारी आढळून येऊ शकते, त्या परिसरातील नागरिकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी विनंती करित आहेत. या ३६ पथकांपैकी ३३ पथके ही विभाग स्तरावर कार्यरत आहेत. तर उर्वरित ३ पथके ही इतर पथकांच्या कामांचे पर्यवेक्षण करण्यासाठी शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरांमध्ये कार्यरत आहेत. महापालिका क्षेत्रात सुमारे ८० हजार आसनांची ८ हजार ४१५ शौचालये आहेत. याशिवाय जानेवारी २०१७ पासून ४ हजार २५७ आसनांची नवीन शौचालये बांधण्यात आली आहेत. या शौचालयांचा वापर नागरिकांनी करावा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.