प्रकृती गंभीर गुपचूप सलाईन लावल्याने जरांगे संतप्त
मुंबई : अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांची प्रकृती आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी अधिकच खालावली. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला त्यामुळे चिंता अधिकच वाढली. अखेर जरांगे यांना सलाईन लावले. मात्र मी झोपेत असताना मला सलाईन लावले अशी तक्रार करीत जरांगे यांनी सलाईन काढून टाकले आणि संतप्त होऊन सरकारवर हल्लाबोल केला. मला सलाईन लावून सरकार आराम करील असे ते म्हणाले.दरम्यान, जरांगेंची प्रकृती खालावत असताना बघ्याची भूमिका घेणार्या राज्य सरकारच्या निषेधार्थ आज मराठवाडयात कडकडीत बंद पाळण्यात आला. मराठवाडयातील आठही जिल्ह्यांमध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंदठेवण्यात आली.
आळंदीमध्येही आज कडकडीत बंद पाळण्यात आला. लातूरची गंजगोलाई ही मोठी बाजारपेठही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. बीड, मनमाड, धाराशीव, संभाजीनगर, वैजापूर, गंगापूर, कन्नड, सोयगाव, लासूर, हिंगोली, बारामती, सोलापूर जालना, कर्जत, पारनेर आणि जामखेड आदि ठिकाणी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. सोलापुरातही बंद यशस्वी झाला. उपचार घेण्यास तयार नसलेले जरांगे आज त्यांना डॉक्टरांनी सलाईन लावल्याने संतापले.’ आपल्याच माणसांनी मला झोपेत असताना सलाईन लावले. सलाईन कसले लावता.त्यापेक्षा सरकारला धारेवर धरा. अधिसूचना लागू करायला सरकारला भाग पाडा,मग खुशाल सलाईन लावा, पाणी पाजा, असे जरांगे म्हणाले. मी मरायला तयार आहे.तुम्ही कोण मला वाचवणारे ? असा संतप्त सवालही त्यांनी आपल्या सहकार्यांना उद्देशून केला.
20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.