मुंबई : भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजप कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात रवींद्र चव्हाण यांचे नाव वगळण्यात आले होते, तेव्हापासून पक्ष त्यांच्यावर मोठी जबाबदारी देणार अशी चर्चा होती, अखेर आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र भाजप कार्यकारी अध्यक्षपदाची मिळालेली जबाबदारी ही महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील पुणे, नागपूरसह अनेक शहरांच्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्ठाच्या निवडणुका आहेत. विधानसभेतील यशाचा कित्ता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही गिरवण्याचे आव्हान चव्हाणांसमोर असणार आहे.
राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः – रवींद्र चव्हाण
“राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा पक्षाचा मंत्र मनात ठेवून काम करत असल्याचे सांगत रवींद्र चव्हाण यांनी पक्षाने दिलेलेल्या नवीन जबाबदारीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्र प्रदेशाध्य७ चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षातील सर्व वरिष्ठांचे आभार मानले आहेत. एक्स या सोशल मीडियावर रवींद्र चव्हाण यांनी पोस्ट करत पक्षाने दिलेल्या नवीन जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडणार असा विश्वास व्यक्त केला आहे.