दिवाळीपूर्वीच फटाकेबंदीवरून राजकीय आतषबाजी
मुंबई : अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाची जोरदार तयारी सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी शालेय विद्याथ्यांना प्रदुषण मुक्त दिवाळीची शपथ दिली. फटाकेबंदीवरून शिवसेनेत दुफळी पडल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यात उडी घेत, हिंदु सणांवरच बंदी का, असा सवाल उपस्थित केलाय. त्यामुळे दिवाळीपूर्वीच राजकीय आतषबाजी सुरू झालीय.
दिल्लीप्रमाणेच मुंबई उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाक्यांची खुलेआम विक्री करण्यास बंदी घातलीय. सुरक्षेच्या कारणासाठी न्यायालयाने हा निर्णय दिलाय. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही फटाक्यांना बंदी घालावी अशी मागणी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय. मात्र शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी फटाके बंदीवर आक्षेप घेतला आहे. फटाक्यांवर अनेकांचा रोजगार अवलंबून असल्याने फटाकेविक्री बंद करु नका, अशी भूमिका राऊत यांनी स्पष्ट केलीय. त्यामुळे फटाकेबंदीच्या मुद्दयावरून सेनेच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही फटाकेबंदीला विरेाध दर्शविला आहे. हिंदू सण साजरे करण्यावरच बंदी का येते, आता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? असा सवाल राज यांनी उपस्थित केलाय. दिवाळीचा सण जसा साजरा करतात, तसा साजरा करावा, असं आवाहनही राज यांनी केलंय.