मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून महिलांना दीड हजार रुपये दिले जात असतानाच, दुसरीकडे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवरुन विरोधक आक्रमक बनले आहेत. आता बदलापूर घटनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे संतापले आहेत. बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना निर्माण करा असे खडे बोल सुनावणीत राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलंय.
राज ठाकरे यांनी एक्स वरील पोस्ट वरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय, याचा मला अभिमान आहे. पण, मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असेही राज यांनी ट्विटरवरुन लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुखमंत्र्यांना लक्ष्य
मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली असून आज ते गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. दरम्यान, बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेवरुन संतप्त शब्दात राज ठाकरे यांनी भावना व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं आहे.
***