बदलापूर पालिकेचा साडेतीन कोटीचा दिशादर्शक घोटाळा ? 

मुख्याधिका-यांना वकिलाची नोटीस 

   बदलापूर :  कुळगाव बदलापूर पालिकेच्या दिशादर्शक जाहिरात निविदेतील भ्रष्टाचाराबाबत योग्य ती कारवाई न केल्याबद्दल व पालिकेच्या आर्थिक नुकसानीस दुर्लक्षित केल्याप्रकरणी   पालिका मुख्याधिकाऱ्यांना वकिलाची नोटीस पाठविण्यात आली आहे. कायद्याने वागा लोक चळवळीचे केंद्रीय कार्याध्यक्ष,पत्रकार विनायक जाधव यांनी ही नोटीस पाठवली आहे.  गेल्या दोन वर्षापासून ते याचा पाठपुरावा करीत आहेत.

निविदेतील भ्रष्टाचाराची माहिती पालिकेकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असतानाही ,त्यात दिरंगाई करणे ,दिशाभूल करणारी माहिती देणे, अपूर्ण माहिती देणे असे प्रकार नगररचना विभागाने केले. त्याबाबत  जाधव यांनी अनेकवेळा मुख्याधिकारी व ठाणे जिल्हाधिकारी, यांच्याकडे तक्रारी  केल्या आहेत पालिकेला या निविदा प्रक्रियेत स्वस्तिक आर्टस् ,भाग्यश्री आर्टस्,श्रेया कंस्ट्र.,नागेश ऍडव्हर्टाईजींग अशा चार निविदा प्राप्त झाल्या होत्या माहिती अधिकारात पालिकेने केवळ श्रेया कंस्ट्र.यांच्या निविदेचीच  अपूर्ण माहिती दिली .उर्वरित तीन सादर झालेल्या निविदांची कोणतीही माहिती पालिकेने दिली नाही .याबाबत अनेक तक्रारी झाल्यानंतर त्या उर्वरित निविदेच्या तीन फाईली गहाळ असंल्याचे समजून आले. नगर रचना विभाग व भांडार विभाग यांनी फाईल गहाळ प्रकरणात  एकमेकांवर आरोप केले. या फाईली गहाळ कशा झाल्या ? कि गहाळ करण्यात आल्या ? हा प्रश्न जाधव यांनी विचारला आहे पालिकेने यशस्वी निविदा धारक श्रेया कंस्ट्र. यांच्या बरोबर केलेल्या नऊ वर्षांच्या करारात केवळ नऊ लाख रुपयांच् उत्पन्न मान्य  केलंय. मात्र हिच बाब भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे.  पालिकेने केलेला ९ वर्षांचा करार हि संशयास्पद , ठेकेदाराला आर्थिक हिताचा आणि पालिकेला आर्थिक नुकसानीचा आहे. त्यामुळे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे जाधव यांनी सांगितले.

पालिकेचे कोटयावधीचे नुकसान 

ठेकेदार कंपनीने करारानुसार पालिका हद्दीत ४० ठिकाणी दिशादर्शक कमानी उभारायच्या असताना प्रत्यक्षात मात्र २८ ठिकाणीच त्या कमानी उभारल्याची स्थळ यादी पालिकेने दिली आहे .या २८ ठिकाणच्या यादीचा विचार केला तर ठेकेदाराला जाहिराती प्रदर्शनासाठी मिळणारे एकूण क्षेत्रफळ १९३५२ चौ.फू होते. जाहिरात प्रदर्शनाचा ठेका देण्याचा पालिकेचा दर २०१४ सालापासून प्रती चौ. फू २१० रुपये प्रती वर्षी निश्चित झालेला आहे. परंतु पालिकेने ठेकेदार कंपनी बरोबर झालेल्या करारात या दराने करार न करता ठोक  १ लाख रुपये प्रति वर्ष याप्रमाणे ९ वर्षांचे ९ लाख रुपयांचा करार केला . यात प्रतिवर्षी कोणती वाढही सुचवण्यात आलेली नाही. यामुळे पालिकेच मोठं आर्थिक नुकसान झालंय. ठेकेदार कंपनीचा आर्थिक फायदा व्हावा म्हणूनच पालिका अधिकाऱ्यांनी असा करार जाणीव पूर्वक केल्याचा आरोप जाधव यांनी केलाय.

कसा झाला करार 

दिनांक २५.७.२०१२ रोजी सदरचा करार करण्यात आला .त्यावेळी पालिकेचा जाहिरातीचा दर ९० रुपये होता . तर २०१४ सालापासून हा दर २१० रुपये केल्याचा ठराव करण्यात आला .या दरानुसार जरी करार झाला असता तर त्यामुळे २०१४ ते २०१७ या तीन वर्षांचा हिशोब केला तर [ १९३५२ चौ फू X २१० =  ४० लाख ६३ हजार ,९२० रुपये उत्पन्न प्रतिवर्ष  याप्रमाणे  ९ वर्षाचा करार असल्याने [,४०लाख,६३हजार ९२० रुपये प्रतिवर्ष x ९ वर्षे = ३ कोटी ६५ लाख ७५ हजार २८० रुपये पालिकेला मिळाले असते . पण ठेकेदाराबरोबर केलेल्या ९ वर्षांच्या करारात पालिकेला केवळ ९ लाख रुपयेच मिळणार आहेत असे जाधव यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात  मुख्यमंत्री,नगरविकास सचिव ,संचालक ,नगरपालिका संचलनालय , महानिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रारी केल्या आहेत.

चौकट –  भिवंडी निजामपूर शहर महापालिकेतील परवाना विभागातील ८० लाखांचा जाहिरात भ्रष्टाचारही जाधव यांनी उघडकीस आणला असून, परवाना विभागाने सध्यातरी ४० लाख रुपयांचा भ्रष्टाचार मान्य करून त्या रक्कम वसुलीचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला आहे. भिवंडी निजामपूर शहर महापालिका आयुक्तानाही नोटीस पाठवण्यात आली असल्याचे जाधव यांनी सांगितलं .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *