महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला   

मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार का? असा प्रश्न महायुतीतील नेते विचारत आहेत, पण पृथ्वीराज चव्हाण किंवा शरद पवार यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, माझा पाठिंबा असेल, असं खुलं आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं.  विधानसभेत जागेवरून  मारामारी करू नका. एकजूट किंवा वज्रमूठ हे केवळ शब्दात असता कामा नये तर वज्रमूठ ही कामातून दिसली पाहिजे. असे यावेळी ठाकरेंकडून उपस्थितांना स्पष्टपणे सांगण्यात आले. महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ आज मुंबईतील षणमुखानंद सभागृहात वाढवण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनीआपल्या शैलीत भाषण करत सरकारवर ताशेरे ओढले.

 महाविकास आघाडी पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात पार पडले. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत,  आमदार आदित्य ठाकरे  यांच्यासह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की,  लोकसभेला राजकीय शत्रूंना पाणी पाजलं, ती संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणाची लढाई होती. आता विधानसभेला महाराष्ट्र धर्मरक्षण, अस्मिता, संस्कृती,  स्वाभिमान जपण्याची लढाई आहे. ते महाराष्ट्र लुटायला आलेत. एक तर तू राहशील किंवा मी राहीन, या जिद्दीने लढायला पाहिजे, असं मी नेहमी म्हणतो. फक्त हे आपल्या तिघा मित्रपक्षात व्हायला नको. राष्ट्रवादी-काँग्रेस आणि आमच्यात आपसात तू राहशील की मी, असं नको व्हायला, अशी मिश्कील टिपणीही उद्धव ठाकरे यांनी केली.  माझं निवडणूक आयोगाला सांगणं आहे, की महाराष्ट्राची निवडणूक जाहीर करावी, आमची तयारी आहे. बोलणं सोपं आहे पण लढाई सोपी नाही. त्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे एकदिलाने  काम करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. 

ठाकरे म्हणाले की,   भाजपसोबतच्या अनुभवाची मला पुनरावृत्ती नकोय. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री या सूत्रात धोका आहे. जागा जास्त येण्यासाठी आपल्यातच पाडापाडी केली जाते. आम्हाला भारत सरकार हवे, मोदी सरकार नको. घोटाळेबाज योजनांच्या जाहिराबाजीसाठी जनतेच्या पैशांची लूट होत आहे. गावागावांत जाऊन आपली चांगली कामं सांगा, असंही ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

विधानसभेत जागेवरून  मारामारी करू नका. एखादी जागा ही काँग्रेसकडे गेली तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचे नाही, असे करून चालणार नाही. शिवसेनेकडे एखादी जागा आली तर काँग्रेस, राष्ट्रवादीने काम करायचे नाही, असे करायचे नाही. राष्ट्रवादीकडे जागा गेली तरी सगळ्यांनी मिळून काम केले पाहिजे. एकजूट किंवा वज्रमूठ हे केवळ शब्दात असता कामा नये तर वज्रमूठ ही कामातून दिसली पाहिजे. असे यावेळी ठाकरेंकडून उपस्थितांना स्पष्टपणे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *