मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सुरू होती. मात्र हि चर्चा सत्यात उतरणार असल्याची दिसून येत आहे. आज अखेर अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठी खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे.
अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसला रामराम ठोकणाऱ्या चव्हाणांसोबत अंदाजे १५ आमदार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नसीम खान यांच्यात महत्वाची बैठक झाली. यावेळी तिन्ही नेत्यांकडून काँग्रेसच्या आमदारांशी संपर्क करण्यात येत आहे.
माझा निर्णय दोन दिवसांत जाहीर करेन : चव्हाण
याबाबत माध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी म्हटलं की, ‘मी आज माझा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. माझा कोणावरही राग नाही, काँग्रेसमध्ये मी आत्तापर्यंत प्रमाणिकणे काम केलं. मी माझा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करेन. फक्त दोन दिवस थांबा असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
—-माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार का? त्यांच्या राजीनाम्यावर जितेंद्र आव्हाड आणि खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला यावर माझा विश्वास बसत नाही. तो का दिला हे माहीत नाही पण वाईट वाटतं, ज्या घरात काँग्रेसने 1952 सालापासून मंत्रिपद दिलं. मंत्रीपद महत्वाचं नाही मात्र चव्हाण यांचे घराणे हे काँग्रेसच्या विचारांचे होते. शंकरराव चव्हाण कट्टर काँग्रेसचे होते.
अशोक चव्हाण देखील कट्टर काँग्रेसचे होते. असं काय झालं की त्यांना पक्ष सोडावा लागतोय माझा विश्वास बसत नाही मात्र जे होतंय ते दुर्दैवी आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण येथे आपले मत व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे आव्हाड यांनी आपले प्रतिक्रिया देताना जे होतंय ते दुर्दैवी असे म्हटले आहे.