एरोबिक जिम्नॅस्टिक्स मध्ये ईश्वरी आणि अमेय सुवर्ण पदकाचे मानकरी
खेळाडूंना दात्यांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन
डोंबिवली :- जिम्नॅस्टिक्स खेळ प्रकारात डोंबिवलीतील ईश्वरी शिरोडकर आणि अमेय शिंदे या दोन खेळाडूनी वैयक्तिक आणि मिश्र दुहेरी गटात चमकदार कामगिरी करताना सुवर्ण पदक पटकाविले आहे. स्पोर्ट्स अकॉर्ड फाउंडेशनच्या माध्यमातून बँकॉक येथे १ व २ मे रोजी झालेल्या एशियन चम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झालेल्या २० पेक्षा जास्त खेळाडूवर मात करत अमेय आणि ईश्वरी या खेळाडूनी हे यश मिळवले आहे. ईश्वरी आणि अमेय यांनी या खेळासाठी लागणारे साहित्य अतिशय महागडे असून गरीब खेळाडूंना या साहित्याची खरेदी करणे परवडत नाही त्यामुळेच क्रिकेटप्रमाणेच या खेळाला देखील दात्यांनी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन केले असून पालिकेच्या बंदिस्त सभागृहात देखील या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्याही सुविधा नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
डोंबिवलीतील खेळाडूना व्यासपीठ आणि संधी मिळवून देण्यासाठी डॉ. मिलिंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या स्पोर्ट्स अकॉर्ड फाउंडेशन या संस्थेकडून जिम्नॅस्टिक्स, बडमिंटन, अथलेटीक्स, स्विमिंग आणि योगा या खेळाचे प्रशिक्षित प्रशिक्षका कडून मार्गदर्शन केले जात असून या संस्थेत ५० पेक्षा जास्त खेळाडू दररोज सराव करतात. यात २० खेळाडू जिम्नॅस्टिक्सचा सराव करत असून त्यांना सतीश पाटील आणि प्रसाद दारवेकर या प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाते. या संस्थेचे खेळाडू असलेल्या ईश्वरी आणि अमेय यांनी यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चमकदार कामगिरी करताना इसाक फेडरेशन मार्फत खेळलेल्या इंडियन ओपन स्पर्धेत देखील सुवर्ण आणि रौप्य पदकावर नाव कोरले होते. मागील १३ वर्षापासून अविरत सराव करणारे हे दोन गुणी खेळाडू दररोजच्या ६ तासाच्या आपल्या सरावा बरोबरच नवोदित खेळाडूना देखील मार्गदर्शन करतात. राष्ट्रकुल सारख्या मानाच्या स्पर्धामध्ये भारताचे नेतृत्व करण्याची संधी आपल्याला देखील मिळावी अशी या खेळाडूची अपेक्षा असून या दोन खेळाडू व्यतिरिक्त महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या वतीने चेंबूर येथे घेण्यात आलेल्या महापौर चषक स्पर्धेत संचिता घनवट आणि शुभम जोगळे या दोन खेळाडूंनी देखील सुवर्ण पदक विजेती कामगिरी केलयाची माहिती संस्थेच्या खजिनदार शीतल चौगुले यांनी दिली. संस्थेच्या वतीने सुट्टीच्या कालावधीत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून ४ मे ते १९ मे दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात होणार्या या शिबिरात खेळाडूना प्रवेश घेता येईल. तर हौशी खेळाडूना संस्थेकडून योग्य मार्गदर्शन केले जाईल.