पोषणावर ११९० तर मानधनावर १३०० कोटी खर्च
 संप मागे : पंकजा मुंडे यांचे आवाहन

मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनावर राज्य सरकार प्रत्येक वर्षी साधारण ९२६ कोटी रुपये खर्च करते. नुकत्याच जाहीर केलेल्या मानधनवाढीसाठी साधारण ३११.३३ कोटी रुपये लागणार आहेत. शिवाय अंगणवाडी सेविकांना देण्यात येणारी भाऊबीजही दुप्पट करण्यात आली असून त्यासाठी साधारण ५२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात मानधनासाठी साधारण १३०० कोटी रुपये लागणार आहेत. एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत पोषणावर साधारण ११९० कोटी रुपये खर्च करण्यात येतो. आता पोषणापेक्षा मानधनावर अधिक खर्च होणार आहे अशी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
राज्य सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची घोषण नुकतीच केली. ही मानधनवाढ मान्य करुन राज्यातील साधारण २३ हजार अंगणवाडी कर्मचारी कामावर हजर झाल्या आहेत. पण काही अंगणवाडी संघटना मात्र अट्टाहास करीत असून, अधिक मानधन वाढीसाठी अजुनही संपावर आहेत. बालकांना उपाशी ठेवणे अत्यंत चुकीचे असून, पोषण आहार पुरवठा ही दैनंदीन अत्यावश्यक बाब आहे. उर्वरीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही तातडीने संप मागे घेऊन बालकांना उपाशी न ठेवता त्यांचा पोषण आहार पुरवठा सुरु करावा, असे आवाहन मुंडे यांनी केले. नुकतच्या झालेल्या मानधनवाढीनंतर राज्यात कालपर्यंत ११ हजार २३५ अंगणवाडी सेविका, ११ हजार ८६ मदतनीस व १ हजार २१२ मिनी अंगणवाडी सेविका कामावर हजर झाल्या आहेत. याशिवाय ७ हजार १६१ इतक्या आशा वर्करमार्फत पोषण आहार पुरवठ्याचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. सोमवारपर्यंत राज्यातील साधारण २८ हजार ५३९ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठ्याचे कामकाज सुरु झाले असून, उद्यापर्यंत साधारण ५० हजार अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार पुरवठा सुरु होईल असेही मुंडे यांनी सांगितले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी पंकजा मुंडे यांनी चर्चा केली. रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीस महिला -बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड, उपसचिव लालसिंग गुजर, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे पदाधिकारी एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, भगवान देशमुख आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!