मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. मात्र निवडणुकीआधी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केलं आहे. तेव्हा राज ठाकरे कुठे होते ? असा सवाल शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलाय.

‘आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीत त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके याच निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती लक्षात घेता भाजपने आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा,’ अशी विनंती राज यांनी केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी काही तास बाकी असतानाच राज यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. खासदार सावंत म्हणाले की, ‘राज ठाकरे यांनी भूमिका घेण्यास खरंतर उशीर केलाय. मात्र देर आये दुरूस्त आये, असं म्हणता येईल. परंतु या निवडणुकीआधी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत गलिच्छ राजकारण केलं आहे. धनुष्यबाण या चिन्हाचा गैरवापर होईल, असं सांगत शिंदे गटाने निवडणूक आयोगात धाव घेतली. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नावही गोठवण्यात आलं. तसंच नंतर ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला जाऊ नये, यासाठी सरकारने महापालिकेवर दबाव आणला. मात्र आम्ही असा दबाव आणला नाही, असं ते म्हणत होते. मग आमचा प्रश्न असा आहे की, तुम्ही दबाव आणला नसेल तर राजीनामा स्वीकारण्याचे आदेश तरी पालिका आयुक्तांना का दिले नाहीत? हा सगळा छळवाद सुरू असताना राज ठाकरे कुठे होते? त्यामुळे राज यांनी आज जी भूमिका घेतली त्यास उशीर झाला आहे,’ असा हल्लाबोल खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तसंच भाजपच्या नेत्यांना पराभव समोर दिसू लागल्याने माघार घेण्यासाठी त्यांनीच राज ठाकरेंना पत्र लिहायला तर लावलं नाही ना, अशी शंकाही सावंत यांनी उपस्थित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!