कुंडलिका समुद्र खाडीत अवैध उपसावर धाडसत्र : २० लाख किमतीचे ५ सेक्शन पंप ताब्यात,
अलिबाग तहसीलदारांची कारवाई : वाळू माफियांचे धाबे दणाणले
अलिबाग : कुंडलिका समुद्र खाडीत बेकायदेशीर सुरू असलेल्या वाळु उपसविरोधात अलिबाग तहसीलदार कार्यालयाने धडक कारवाई केलीय. या कारवाईत सुमारे २० लाख रुपये किमतीचे ५ सेक्शन पंप दिवी पारंगी परिसरातुन ताब्यात घेण्यात आले असून या धडक कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
अलिबाग तहसीलदार प्रकाश सकपाल, रेवदंडा बंदर निरीक्षक अमर पालवणकर यांचे समवेत चौल मंडळ अधिकारी सत्यवान कांबळे, रेवदंडा तलाठी सी.एम.दिवेकर, चणेरा मंडळ अधिकारी पो.टी.लहाने, रेवदंडा पोलिस ठाणे पोलिस नाईक सुशांत भाईर, पोलिस शिपाई पंकज राक्षे तसेच पोलिस कर्मचारी वर्ग व महसूल कर्मचारी यांच्या टीमने ही कारवाई केली. विशेष म्हणजे या टीमने रेवदंडा मोठे बंदर येथून पोलिसांच्या भगवती बोटीने कुंडलिका खाडी कडे प्रस्थान करीत, कुंडलिका खाडीत वाळू उपसा विरोधात शोध मोहीम सुरू असताना दिवी परंगी परिसरात अंदाजे २० लाख रुपये किमतीचे ५ सेक्शन बेवारस स्थितीत आढळून आले. हे ५ सेक्शन पंप भगवती बोटीला बांधून रेवदंडा मोठे बंदर येथे समुद्रकिनारी आणण्यात आले. यावेळी ५ पंपाची तोडफोड करून विल्हेवाट ही लावण्यात आली. या धाडसत्रमध्ये अलिबाग तहसीलदार प्रकाश सकपाल तसेच रेवदंडा बंदर निरीक्षक अमर पालवणकर यांनी मोलाची भूमिका बजावली.