आदित्य ठाकरेंनीही घेतला ठेका
डोंबिवली : डोंबिवली शहरात सुरु असलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आयोजित रासरंग २०१७ या गरबा कार्यक्रमात दांडियाच्या तालावर बेभान होऊन नाचणाऱ्या तरुणाईसोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी देखील ठेका धरला. ‘जय जय महाराष्ट्र माझा’च्या सुरावटींवर गरब्याचा ठेका धरून तरुणाई बेभान होऊन नाचत होती. यावेळी मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कलाकार मंगेश देसाई , खासदार श्रीकांत शिंदे, केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनीही ठेका धरला.
नवरात्रौत्सवानिमित्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या ‘रासरंग २०१७’ या दांडिया उत्सवाला डोंबिवलीकरांचा आणि विशेषत: तरुणाईचा अफाट प्रतिसाद लाभत असून आत्तापर्यंत जवळपास ६० ते ७० हजार लोकांनी या दांडिया उत्सवाला हजेरी लावली आहे. दांडियाच्या ठेक्यावर बेभान होऊन ताल धरणारी तरुणाई हा डोंबिवलीकरांच्या खास आकर्षणाचा विषय ठरला आहे. अस्सल दांडियाचा आस्वाद घ्यायचा तर ठाणे किंवा मुंबईला जायचे, हा आजवरचा शिरस्ता मोडून काढण्यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यंदा प्रथमच डोंबिवलीत डीएनसी शाळेच्या मैदानावर ‘रासरंग २०१७’या भव्य दांडियाचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवसापासूनच केवळ डोंबिवलीच नव्हे, तर कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ येथील रहिवाशांनीही या उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तरुणाईच्या या वाढत्या प्रतिसादामुळे २५ हजार चौरस फुटाचा डान्स फ्लोअरही कमी पडू लागला. त्यामुळे अखेरीस तो ४० हजार चौरस फुटापर्यंत वाढवण्यात आला.