महाडमध्ये अग्नितांडव ; काय घडलं वाचा सविस्तर !
महाड (निलेश पवार) : महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही आँरगॅनिकमध्ये लागलेल्या भीषण आगीत या कंपनीशेजारी असणारी देवा ड्रील ही कंपनी भस्मसात झाली. या आगीमध्ये कोट्यावधी रूपयांची हानी झाली असून, आग लागल्यानंतर उडालेल्या धावपळीमध्ये कंपनीतील चार कामगार जखमी झाले आहेत.
महाड औद्योगिक क्षेत्रातील प्रिव्ही ऑरगॅनिक युनीट दोन मध्ये आज दुपारी एकच्या सुमारास आयनॅान प्लँटमध्ये अचानक स्फोट झाला. या नंतरच लगेचच हायड्रोजेनिक प्लांट मध्येही मोठा स्फोट झाला. स्फोटाची मालिका सुरू असल्याने आगीने पाहता क्षणी रौद्र रूप धारण केले. व कंपनीच्या पुढील भागामध्ये आग मोठ्या प्रमाणात पसरली. या आगीचे आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणात हवेमध्ये पसरले.
शंभर वाहने जळून खाक
दहा किलोमीटर अंतरावर असणा-या महाड शहरालाही धुराचा त्रास सहन करावा लागला. ही आग एवढ्या मोठ्या स्वरूपाची होती की कंपनीच्या बाहेर उभी असणारी कामगारांची शंभर एक वाहने या आगीत जळून गेली. या आगीचे लोण शेजारी असणा-या देवा ड्रील या कंपनीपर्यंत पोहचले. या कंपनीमध्ये असणा-या रासायनिक पिंपाचेही स्फोट होऊ लागले. कंपनीच्या बाहेर ही आग पसरू लागली. महाड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दल, महाड नगरपालिका तसेच परिसरातील पाण्याचे असंख्य टँकर आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. शर्थीचे प्रयत्न करूनही आग आटोक्यात येण्याची चिन्ह दिसत नव्हती. मागच्या बाजूनेही ही आग हळूहळू पसरू लागली होती.
मातीचे व खडीचे ट्रक एका पाठोपाठ आणून आगीच्या परीसरामध्ये टाकले जात होते. तरीही धूराच्या त्रासामुळे आग विझविण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. स्थानिक अग्निशमन यंत्रणेच्या मर्यादा कमी पडू लागल्याने चिपळूण, रोहा, नागोठणे या ठिकाणाहून अग्निशमन यंत्रणा मागविण्यात आली. पोलीस यंत्रणेकडून हा परिसर तात्काळ बंद करण्यात आला. सुमारे सात ते आठ अॅंम्ब्युलन्सही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र ज्या ठिकाणी आग लागली तेथून रासायनिक द्रावण पसरु लागले. या द्रावणाला लागलेली आग पाण्याने विझवणे कठिण झाल्याने त्या करिता फोमच्या गाड्यांची वाट पगावी लागली त्यामुळे आग आणखीनच पसरली.
गावकऱ्यांना सुरक्षीत स्थळी हलवले
आग लागताच कंपनीच्या कामगारांमध्ये मोठया प्रमाणात घबराट निर्माण झाली होती. कंपनीतील सर्व कामगार ताबडतोब बाहेर पडले. या धावपळीत व काहींनी उड्याही मारल्याने ओंकार मांडे,नथुराम मांडे,रमेश मांडे हे कामगार व मदत करण्यासाठी आलेला नागेश देशमुख असे चारजण जखमी झाले. तसेच शेजारील देवा ड्रिल, लासा, सानिका वइतर कंपनीत कामगार कंपनी बाहेर सुरक्षिततेच्या कारणास्तव बाहेर काढण्यात आले.कंपनीपासुन अर्धा किमी अंतरावर असलेल्या आसनपोई, धामणे, जीते , खैरे, नागलवाडी ,शेलटोली येथे काळ्या धूराचा त्रास होऊ लागल्याने गावातील ग्रामस्थानाही सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.तर कंपनी परिसरातील सुमारे तीस कारखान्यांचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. याच कंपनी शेजारी महाड तालुक्याला वीजपुरवठा करणारे सबस्टेशन असुन हे स्टेशनही तात्काळ बंद करण्यात आल्याने सपूर्ण तालुक्यातील वीज पुरवठा दुपारपासुन बंद करण्यात आला होता. दरम्यान कंपनीमध्ये काही कामगार अडकून पडले आहेत की नाही अथवा जिवीत हानी बाबतचा तपशिल आग आटोक्यात आल्यावर मिळू शकेल. .या आगीत कोट्यावधी रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली आहे. प्रिव्हि कंपनी ही औद्योगिक क्षेत्रातील नामांकित कंपनी असुन या नुकसानीमुळे येथे काम करणा-या शेकडो कामगारांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
…………
आग लागताच कंपनीतील कामगारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.आगीचे कारण व झालेली हानी या बाबतचा तपशील आग आटोक्यात आल्यावर उपलब्ध होईल – (संभाजी पठारे उपाध्यक्ष, प्रिव्हि आँरगॅनिक)
——