नाणार प्रकल्पावरून शिवसेना- भाजपमध्ये जुंपली !
अधिसूचना रद्द करण्याची घोषणा केवळ फार्स : मुंडेची टीका
मुंबई (संतोष गायकवाड) : नाणार प्रकल्पावरून कॉंग्रेससने शिवसेनेवर जहरी टीका केली असतानाच उद्योगमंत्र्यांनी अधिसूचना रद्द केल्याचा घेतलेला निर्णय आणि मंत्र्यांना अधिकार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण यावरून शिवसेना भाजपमध्येच जुंपलीय.
अधिसूचना रद्द केल्याची उद्योग मंत्र्यांची घोषणा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार मध्ये सभा घेतली. नाणार प्रकल्पसाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली.
मंत्र्यांना अधिकारच नाही : मुख्यमंत्री
नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही. हा अधिकार मुख्य सचिवांच्या समितीला आहे.
अधिसूचना रद्द करण्याचा कोणताही प्रस्ताव समितीसमोर
आलेला नाही. शिवसेना आणि देसाईच हे व्यक्तिगत मत आहे असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन शिवसेनेला तोंडघशी पाडलंय.
शिवसेनेचा विरोध डावलून निर्णय करून दाखवा: अनिल परब
शिवसेनेचे उपनेते, आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. अधिसूचना काढण्याचा अधिकार जर मंत्र्यांना आहे तर रद्द करण्याचा अधिकारही मंत्र्यांना आहे. हाय पॉवर कमिटीला अधिकार आहे आणि मंत्र्यांना नाही असं कुठल्याही कायद्यात नाही. शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतली आहे, आता हा प्रकल्प ज्यांना करायचा आहे त्यांनी करून दाखवावा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात शिवसेनेचा विरोध डावलून निर्णय करून दाखवावा. सर्व शहा आणि मोदी कोकणवासी कधी झाले, कोकणात शेती कधीपासून करू लागले. हे सर्व शेतकरी नसून जमिनीचे दलाल आहेत. मुख्यमंत्री नाणार वासीयांच्या बाजूने उभे राहणार की शहा – मोदी – सिंघवी सारख्या दलालांच्या मागे उभे राहणार हा शिवसेनेचा सवाल आहे.
भूसंपादनाबाबतची अधिसूचना रद्द करण्याची उद्योगमंत्र्यांची घोषणा म्हणजे फार्स – धनंजय मुंडे
मुंबई — कोकणातील बहुचर्चित नाणार प्रकल्पाबाबत सेना – भाजपा या दोघांकडूनही कोकणवासीयांचा विश्वासघात आणि फसवणूक करणे सुरू आहे, आज नाणार भूसंपादनाबाबत 18 मे 2017 ची अधिसूचना रद्द करण्याची उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केलेली घोषणाही फार्सच असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलीय.
नाणार मधील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची कोणतीही कारवाई विभागाने सुरूच केलेली नसतांना ही घोषणा म्हणजे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोर केलेला दिखावा आहे. देसाई यांनी या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची परवानगी घेतली होती का ? कॅबिनेट निर्णय झाला आहे का ? हा प्रकल्प नाणार मध्ये येणार हे माहीत असतांना आज पर्यंत शिवसेना आणि त्यांचे मंत्री गप्प का बसले ? असे सवाल उपस्थित करतानाच सेना आणि भाजपा हे दोघे मिळून कोकण वासीयांची फसवणूक करन, विश्वासघात करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
**