अमित शहांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी
मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या टेंपल एन्टरप्रायझेस या कंपनीचा टर्न ओव्हार अवघ्या ५० हजार रुपयांचा असताना एका वर्षात १६ हजार पटींनी उलाढाल कशी काय वाढवू शकते? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला असून या गैरव्यवहाराची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी. तसेच अमित शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
जय शहा यांच्या कंपनीचा टर्न ओव्हार एका वर्षात १६ हजार पटींनी कशी वाढली याचे वृत्त द वायर या वेबपोर्टलने दिल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे शहा यांच्या चौकशीची मागणी काँग्रेसने उचलून धरली आहे. कंपनीच्या व्यवहारात अचानक १६ हजार पटींनी वाढ झाल्यानंतर ऑक्टोबर २०१६ मध्ये ही कंपनी अचानक बंद करण्यात आली. ८ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदीचा निर्णय होण्याच्या काही दिवस अगोदर ही कंपनी बंद करणे, याला निव्वळ एक योगायोगच मानायचा का? लालकृष्ण आडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरी यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. त्यामळे अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी भाजपमधील राष्ट्रीय अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या इतिहासाची आठवण चव्हाण यांनी करून दिलीय.
ऊर्जामंत्रालयाकडून १० कोटीचे कर्ज
जय शहा यांच्या बचावासाठी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी पुढाकार घेतल्याने या प्रकरणाचे अधिकच गुढ वाढल्याचे काँग्रेस म्हटलय. पियुष गोयल नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्रालयाचे मंत्री असताना त्यांच्या अखत्यारीतील भारतीय नवीकरणीय उर्जा विकास संस्था नामक सार्वजनिक कंपनीतून जय शहा यांच्या कंपनीला पवन उर्जा प्रकल्पासाठी १०.३५ कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. जय शहा यांची कंपनी समभाग विक्रीच्या व्यवसायात असून, त्यांचा पवन उर्जा प्रकल्पाच्या उभारणीचा कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळे त्या कर्जासंदर्भात गोयल यांनी उत्तर दिले पाहिजे असेही चव्हाण म्हणाले.