महाराष्ट्रातील  मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना पद्मविभूषण प्रदान

नवी दिल्ली :  प्रसिध्द हिंदुस्तानी शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना राष्ट्रपती  रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या  हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  महाराष्ट्रातील ७  मान्यवरांचा यात समावेश आहे.  यावेळी उपराष्ट्रती एम. व्यंकय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणा-या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला यावर्षी देशातील पद्म पुरस्कार प्राप्त ८५ मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण १० मान्यवरांचा समावेश आहे, पैकी ७ जणांना आज सन्मानीत करण्यात आले तर एका मान्यवरांस मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढच्या टप्प्यातील पुरस्कार  पुढील महिन्यात  प्रदान करण्यात येणार आहे. पूरस्कारांचे वितरण दोन टप्प्यात करण्यात येते. आज पहिल्या टप्प्यात काही मान्यवरांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी रामपूर साहसवान घराण्याचे गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च मानाच्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदुस्तानी शास्रीय गायक, संगीत दिग्दर्शक, संगीत तज्ज्ञ व अनेक नामवंत गायकांचे गुरु म्हणून ते‍ विख्यात आहेत.

पंडित अरविंद पारिख यांना पद्मभूषण

संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंडित अरविंद पारिख यांना पद्मभूषण  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  सतारवादक व हिंदुस्तानी  शास्त्रीय संगीताचे  दूत अशी ओळख असणारे पंडित पारिख  यांनी युनेस्कोच्या  आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेचे  उपाध्यक्ष म्हणून  काम पाहिले आहे. या समारंभात काही मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले पैकी महाराष्ट्रातील ३ मान्यवरांचा यात समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बंग दाम्पत्यांनी ३० वर्षांहून अधिक काळ गडचिरोली जिल्हयात आरोग्यसेवा प्रदान केली आहे. नवजात शिशु संगोपणाचे त्यांचे मॉडेल बालमृत्यू रोखण्यात प्रभावी ठरले आहे. शिक्षणतज्ज्ञ अरविंद गुप्ता यांना साहित्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी तर क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करणारे संपत रामटेके यांना सामाजिक क्षेत्रात दिलेल्या मोलाच्या योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला होता आज त्यांच्या वतीने पत्नी जया रामटेके यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!