नरेंद्र मोदी यांच्या “एक्झाम वॉरियर्स”पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे राजभवनात शानदार प्रकाशन
मुंबई :- भारत हा विश्व गुरु होऊ शकतो. त्यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेची अमुलाग्र अशी चिकित्सा करावी लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या “एक्झाम वॉरियर्स” या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात राज्यपाल बोलत होते. राजभवन येथे झालेल्या या शानदार समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू खासदार भारतरत्न सचिन तेंडुलकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस आदी उपस्थित होते
मोदी यांच्या पुस्तकाची प्रादेशिक भाषेतील पहिली आवृत्ती मराठी भाषेत प्रकाशित करण्यात आली आहे. मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी या पुस्तकाचे प्रकाशन होत असल्याचा उल्लेख करून राज्यपाल राव यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. पुढे बोलताना राज्यपाल म्हणाले, हे पुस्तक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी मार्गदर्शक असे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुस्तकाच्या लेखनातून विद्यार्थ्यांसह आपल्या समाजाला दिशादर्शक असे विचार ठेवले आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्थेवरही या पुस्तकाच्या निमित्ताने प्रकाश टाकला गेला आहे. एका सर्वेक्षणानुसार आपल्या शिक्षण व्यवस्थेत सर्जनशील आणि मुलगामी विचारांना स्थान दिले जात नाही, हे पुढे आले आहे. त्यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा होणे आवश्यक आहे. शिक्षकांना आणखी सक्षम करण्याची गरज आहे. हे पुस्तक त्या अर्थाने सकारात्मक विचार पुढे आणते. त्यामुळेच आपल्या शिक्षण व्यवस्थेतील पूर्ववैभव पुन्हा मिळविण्यासाठी भारताला विश्व गुरु बनविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेची अमुलाग्र चिकित्सा होण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, परीक्षेवर हजारो पुस्तक लिहिली गेली आहेत. पण हे पुस्तक सर्वार्थाने वेगळे आहे,जे आपल्याशी संवाद साधते. ते ही सोप्या भाषेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हे पुस्तक प्रादेशिक भाषेत देशात पहिल्यांदाच प्रकाशित होत असल्याचे मोठे समाधान आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतील नवभारतातील नवपिढी घडविण्यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरेल. हे पुस्तक जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांपर्यंत पोहचवूया. ज्यामुळे ही नवपिढी आत्मविश्वासाच्या तेजाने भारलेली अशी घडेल असा विश्वास आहे. या पुस्तकात प्रधानमंत्री श्री मोदी ‘लढवय्ये व्हा, रडवय्ये होऊ नका’ असा संदेश देतात. पुस्तकात पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद आहे. पुस्तकाच्या माध्यमातून प्रधानमंत्री यांनी शिक्षक, पालकांना यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी मुलांना निडर बनविण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे ही मुले पुढे जाऊन जगातील कुठलेही शिखर पादाक्रांत करू शकतील असा संदेशही आहे.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणाले की, हे पुस्तक कुणासाठीही सोबती ठरावे असेच आहे. जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रासाठी या पुस्तकातील मंत्र उपयुक्त ठरेल असा आहे. विद्यार्थ्यांसह, पालक आणि शिक्षकांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल असे आहे. जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात सततचा सराव तुम्हाला यशापर्यंत नेऊन पोहचवितो. त्यामुळेच सरावापासून न हटता, इतरांशी आपली तुलना न करता आप-आपल्या क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करत राहणे महत्त्वाचे ठरते. या पुस्तकातून सर्वांसमोर सकारात्मकतेचा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे. यावेळी सचिन तेंडूलकर यांनी पालकांना मुलांना निर्भय बनवा, त्यांना मदत करा पण त्यांच्यावर कोणताही दबाव टाकू नका असे आवाहन केले.