धर्मा पाटील यांचा कमी मोबदला व्याजासह देणार
ऊर्जामंत्रयांचे आश्वासन
मुंबई : धुळे जिल्हयातील मौजे विखरण (देवाचे) येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या मोबदल्या संदर्भात धर्मा पाटील यांना कमी मोबदला मिळाला या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येईल. ही कार्यवाही 30 दिवसाच्या आत पूर्ण करुन नियमानुसार व्याजासह मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांना दिलेत.
धर्मा पाटील यांच्या कुटुंबांचे कुठलेही नुकसान होवू देणार नाही. इतर शेतकऱ्यांना जास्त मोबदला दिला व आपणास कमी मोबदला दिला याबाबत संपूर्ण चौकशी करण्यात येईल. तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी 30 दिवसाच्या आत कार्यवाही करण्यात येईल व कमी मोबदला मिळाला असेल तर या बाबत शासनामार्फत पूर्ण चौकशी करुन नियमानुसार मोबदला देण्याचा अंतीम निर्णय 30 दिवसात करण्यात येईल. शेतीमधील फळ झाडांचे मुल्यांकन व शेती क्षेत्रफळानुसार मोबदला मिळाला नाही. या संदर्भात दिनांक 1 ऑक्टोबर 2012 च्या पंचनाम्याची तपासणी करुन नियमानुसार जे मुल्यांकन येईल त्या मुल्यांकनावर व्याजासहीत जो मोबदला येईल तो देण्याबाबत 30 दिवसात निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी नरेंद्र पाटील यांना दिले आहे.