अनधिकृत बांधकामावरील कारवाईनंतरही, आता उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांकडून होणार पाहणी : महापालिका आयुक्त अजेाय मेहता यांचे आदेश
मुंबई : महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यानंतर त्या ठिकाणी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांकडून खातरजमा केली जाणार आहे. जर त्याठिकाणी योग्य प्रकारे कारवाई झाली नसल्यास संबधित कर्मचा-याविरोधात कारवाई केली जाणार आहे असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाई प्रभावीपणे होण्यासाठी आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय. ज्या तोडकाम कारवायांची पूर्तता होऊन अहवाल सादर झाले आहेत, त्यापैकी ‘आरईटीएमएस’ सॉफ्टवेअरच्या मदतीने निवडण्यात आलेल्या १ टक्का कारवायांच्या बाबतीत उपायुक्तांनी तर ५ टक्के कारवायांच्या बाबत सहाय्यक आयु्क्तांनी प्रत्यक्ष भेट देऊन सदर कारवाई योग्यप्रकारे झाली असल्याची खातरजमा करावयाची आहे.
महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमधील अनधिकृत बांधकामांवरील कार्यवाहीसाठी ६४ पदनिर्देशित अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्रातील तोडकाम कार्यवाही प्रक्रिया ही १ एप्रिल २०१६ पासून ‘रिमूव्हल ऑफ एनक्रोचमेंट ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टीम’ (RETMS) या सॉफ्टवेअरच्या मदतीने केली जात आहे. यानुसार कार्यवाही करण्यात येणा-या ठिकाणांची पाहणी महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांद्वारे नियमितपणे केली जाते. तसेच याबाबत प्राप्त होणा-या तक्रारींचे निवारण नियमितपणे केले जाते. मात्र अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाल्यानंतर सदर कारवाई योग्यप्रकारे झाली नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत असतात. त्यामुळेच तोडकाम कारवाई अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी आता उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्याद्वारे करण्यात येणा-या पाहणी ठिकाणांची निवड ही कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय ‘आरईटीएमएस’ या सॉफ्टवेअरद्वारे आणि निर्धारित प्रमाणानुसार करण्यात येणार आहे.
़़़़