मुंबईतील रेल्वेच्या प्रकल्पांना गती देणार …रेल्वेमंत्री पियुष गोयल 

मुंबई -उपनगरीय रेल्वेचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने सुचविलेल्या विविध प्रकल्पांना रेल्वे बोर्डाच्या बैठकीत मंजुरी घेऊन ती कामे सुरू केली जातील, अशी ग्वाही रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत दिली. तसेच मुंबईत रेल्वेचे जाळे विकसित करताना रेल्वे, एमएमआरडीए, सिडको, महापालिका अशा विविध संस्थानी समन्वयाने काम करावे, अशा सूचना यावेळी रेल्वेमंत्रयांनी केल्या. एमयुटीपी प्रकल्पांतर्गत मुंबई महानगर क्षेत्रात हाती घेण्यात येणाऱ्या विविध रेल्वे प्रकल्पांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वे मंत्री गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला.

हार्बर बोरीवलीपर्यंत…रेल्वे स्थानकांचा विकास

सीएसएमटी – पनवेल दरम्यान फास्ट इलेव्हटेड कॉरिडॉर विकसित करणे, पनवेल ते विरार दरम्यान नवीन उपनगरीय कॉरिडॉर विकसित करणे, हार्बर लाइन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढविणे, इतर काही रेल्वे मार्ग वाढविणे अशा विविध प्रकल्पांची मागणी मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तसेच लोअर परेल, खार रोड, गोरेगाव, मीरा रोड, विरार, घाटकोपर, डोंबिवली, नालासोपारा, भाईंदर, मुलुंड, डोंबिवली, भांडुप, वडाळा रोड, सायन, जिटीबी नगर, चेंबूर, शहाड आदी विविध रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्रयांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली. एकीकडे मेट्रो आणि दुसरीकडे रेल्वेचे नवीन प्रकल्प यांच्या माध्यमातून भविष्यात सामान्य मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान आणि सुखकारक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीस रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहानी, रेल्वे बोर्डाचे सदस्य अभियंता एम. के. गुप्ता, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा, पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए. के. गुप्ता, आमदार आशिष शेलार, राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी सर्वश्री अजोय मेहता, यु.पी.एस. मदान, प्रवीण परदेशी, भूषण गगरानी, मनोज सौनिक, संजयकुमार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *