घाटकोपरमध्ये व्यसनमुक्तीची होळी : खेळाडूनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
घाटकोपर ( निलेश मोरे ) : घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कबड्डीच्या अंतिम सामन्यानंतर दारू , सिगारेट , गुटखा , तंबाखू , मावा यांची होळी करून, खेळाडूंनी व्यसन मुक्तीची शपथ घेतली. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते. यावेळी बोलताना मेहता म्हणाले की, कुठलेही व्यसन हे शरीराला घातक आहे . खेळाडू वृत्ती असणाऱ्या युवकांनी असे घातक व्यसन करू नये . खेळाडूची नशा ही खेळात दिसली पाहिजे . चरस , दारूची , सिगारेटची नशा खेळाडूला संपवते .होळी मध्ये आपण वाईट विचार जाळून टाकतो तसेच वाईट व्यसन सुटण्यासाठी घाटकोपर प्रतिष्ठण कडून व्यसनमुक्तीची होळी ही संकल्पना कौतुकाची असल्याचं मेहता म्हणाले.
भटवाडी येथे घाटकोपर कबड्डी प्रीमिअर लीग 2017 चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा अंतिम सामना संपल्यानंतर घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश जंगम यांच्या संकल्पनेतून खेळाडूंच्या उत्तम आरोग्यासाठी व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला. यावेळी व्यसनांच्या उत्पादनाची होळी करून खेळाडूंना शपथ देण्यात आली. याप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष सुरेश पाटील , नगरसेवक दीपक हांडे , शाखाध्यक्ष शरद भावे , कामगार सेनेचे राज पार्टे , हेमंत पवार आदी उपस्थित होते.