महाराष्ट्र स्वाभिमान नारायण राणे यांचा नवा पक्ष

मुंबई : काँग्रेसला रामराम ठोकून  बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र स्वाभिमान या नव्या पक्षाची घोषणा केली. महाराष्ट्र हेच पक्षाचे कार्यक्षेत्र राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे राणे भाजपात जाणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला. मात्र राणेंचा पक्ष भाजप सरकार मध्ये सामील होऊन मंत्रिपद पदरात पाडून घेईल अशी चर्चा आता रंगली आहे.

महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हितासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आमचा पक्ष प्रयत्नशील राहणार असल्याचे राणे यांनी सांगितलं. पक्षाचे चिन्ह आणि इतर बाबींबाबत लवकरच घोषणा केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेनेच महाराष्ट्राच्या सत्तेतील योगदान शून्य आहे.तसंच सामाजित आर्थिक कुठल्याच क्षेत्रात शिवसेनेनं काहीही काम केलेलं नाही असा आरोप राणेंनी केला आहे. मुंबईतला मराठीचा टक्का कमी होण्यासाठी शिवसेनाच जबबाबदार आहे असं राणें म्हणाले. विरोधकांनी बुलेट ट्रेनवर टीकेची झोड उठवली असताना नारायण राणेंनी मात्र  बुलेट ट्रेनचं समर्थन केलं आहे. 50 वर्षांनी येणारी गोष्ट भारतात दोन-तीन वर्षात येत असेल तर हरकत काय असा सवालही राणेंनी उपस्थित केला. नितेश राणे या नवीन पक्षाचा भाग असतील की नाही याबाबत मात्र राणे यांनी गुप्तता बाळगली आहे. मी ज्योतिषांनी विचारून सांगतो, असं म्हणत नितेश राणे यांच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी उत्तर देणं टाळलं .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!