मुणगे गावातील श्रीदेवी भगवतीचा  वार्षिक जत्रोत्सव  १ ते ५ जानेवारीला 

सिंधुदूर्ग : देवगड तालुक्यातील मुणगे गावातील श्रीदेवी भगवतीचा वार्षिक जत्रोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे यंदा पौष पौर्णिमेला दि. १ ते ५ जानेवारी २०१८ असा पाच दिवस असणार आहे. देवीच्या जत्रोत्सवासाठी दुरवरच्या गावातील भाविकांची मोठी गर्दी होते. वार्षिक यात्रोत्सवात देवीची पूजा-अर्चा, दर्शन, ओट्या भरणे, सायंकाळी गोंधळी गायन, संगीत भजने, प्रवचन व पुराणवाचन, देवीची आरती, पालखी मिरवणूक आणि किर्तन असे कार्यक्रमांचे आयेाजन केले जातात.

सागरी महामार्गाला लागूनच श्रीदेवी भगवतीचे प्राचीन कौलारु देवालय आहे. देवीच्या सध्याची पाषाणमूर्तीची १८१० मध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलीय. काळ्या पाषाणात सुंदर रेखीव कोरीव काम केलेली महिषासूर मर्दीनीच्या रूपात ४ फूट उंचीची मूर्ती असून बाजूला चांदीच्या पत्र्याचा सुंदर नक्षीकाम केलेला महिरप आहे. मूर्तीच्या एका हातात खड्ग, दुस-या हातात त्रिशुल, तिस-या हातात ढाल व चौथ्या हातात शंख असून ती महिषासूरावर पाय ठेवून उभी आहे. देवीचे मंदिर प्रशस्त असून चार भागात विभागले आहे. मंदिराचं बांधकाम हेमांडपंथी असून गाभारा पुरातन पद्धतीप्रमाणे लाकडी गोलाकार खांबांवर कोरीव काम करून बांधण्यात आला आहे. दुस-या भागात आरती, पुराणे सांगितली जातात. तिस-या भागात पालखी ठेवतात तर चौथ्या भागात नृत्य, गोंधळ, कीर्तन- प्रवचन व अवसर काढणे आदी कार्यक्रम होतात. येथेच ग्रामसभा घेतली जाते. सभोवतालचा परिसर मजबूत दगडी चि-यांनी बांधून काढला आहे. मंदीरातील बहुतांशी बांधकाम हे लाकडी असून अतीशय सुबक कोरीवकाम या लाकडी बांधकामावर केलेले आहे. मंदीराचा एकूण परिसरच शांत आणि रमणीय असा आहे. मंदीराच्या मागच्या बाजुला एक बारमाही पाण्याचा झरा असून. येथे हात-पाय धुवूनच देवीच्या दर्शनाला जावे लागते. या झय्रापासून थोड्या अंतरावर महापुरुषाचे जागृत स्थान आहे. मंदीर परिसरात देवी अनभवनी, देवी पावणी, देवी बायची, देवी भावय, ब्राह्मणदेव, देव गिरावळ, देव गांगो व देव गायगरब ई. देवतांची स्थाने आहेत. श्रीदेवी भगवतीच्या जत्रोत्सवासाठी आलेले भाविक इतर देवींचे दर्शन घेतात मात्र  देवी बायची मंदिराला देवस्थान कमिटीकडून कुलूप लावण्यात आल्याने दर्शनासाठी जाणा- या भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!