शाळेत ५०० उठाबशा विद्यार्थीनी रूग्णालयात, शिक्षणमंत्रयानी घेतली भेट
मुंबई : शाळेचा गृहपाठ केला नाही म्हणून शाळेत ५०० उठाबशा काढायला सांगितलेली विद्यार्थी विजया निवृत्ती चौगुले सध्या केईमएम रुग्णालयात उपचार घेत आहे. विजयाच्या उपचाराचा खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येईल असे शिक्षणमंत्री विनोद तावडे सांगितले. तावडे यांनी आज सकाळी केईएम रुग्णालयात जाऊन विजया चौगुले हिची भेट घेऊन तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. या भेटीदरम्यान तिच्यावर उपचार करणारे न्यूरॉलॉजिस्ट डॉ.रावत आणि डॉ.प्रविण बांगर यांच्याकडून तिच्या उपचाराची माहिती घेतली.
विजया चौगुले हिची भेट घेतल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना तावडे यांनी सांगितले की, तिच्यावरील उपचाराबाबत विजयाचे कुटुंबिय समाधानी आहे. विजया लवकरच पूर्णपणे बरी होऊन पुन्हा कोल्हापूरच्या शाळेत जाऊ शकेल. पण विजयाची पुन्हा त्याच शाळेत जाण्याची मानिसकता नसेल तर तिला तेथून जवळच्या दुस-या शाळेत प्रवेश देण्यात येईल. राज्य शासन विजयाच्या पाठीशी उभे असून विजयाच्या उपचारावरील संपूर्ण खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येईल. विजयाबरोबरच विजयाचे वडील त्याच शाळेत शिपाई पदावर नोकरीला असून त्यांनाही त्या शाळेत नोकरी करायची नसेल तर त्यांनाही बाजूच्या शाळेत समायोजित केले जाईल असेही तावडे यांनी यावेळी सांगितले. कोल्हापूरमधील चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रुक येथील भावेश्वरी संदेश विदयालयातील इयत्ता आठवीत विजया चौगुले शिकत आहे. उठाबशाची शिक्षा दिल्यानंतर विजयाला दिल्यानंतर विद्यार्थ्यीनीची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल तिला कोल्हापूरहून मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उठाबशाची शिक्षा देणा-या शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी देवणला पोलिसांनी अटक केली आहे.