डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची दुरूस्ती रखडली : दोन कोटी ३७ लाख रूपये वर्ग, तरीही निविदांचा पत्ताच नाही
महाड सार्वजनिक बांधकाम खात्याचा भोंगळ कारभार
महाड ( निलेश पवार) : येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या दुरूस्तीचे काम गेल्या दहा महिन्यांपासून रखडले आहे. समाजकल्याण विभागाकडून सुमारे २ कोटी ३७ लाख रूपये रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करूनही अजून निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. जीएसटीमुळे निविदा काढण्यास उशिर झाल्याची टोलवाटोलवी आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांकडून केली जात आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभार चव्हाटयावर आला असून, आंबेडकरी अनुयांयीमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतेय.
राज्यात युतीचे सरकार असतानाच महाडमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भव्य स्मारक उभे करण्यात आले स्मारकातील मुलभूत सुविधा पूर्ण होण्याआधीच तत्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन देखील करण्यात आले. यानंतरच्या काळात या स्मारकाची केवळ इमारतच महाडकरांना आणि महाडमध्ये येणा-या भिमसैनीकांना पहावयास मिळत होती. स्मारकाचा ताबा सुरवातीला समाजकल्याण विभागाकडे देण्यात आला होता. समाजकल्याण विभागाकडे यंत्रणा नसल्याने अखेर हे काम पुणे येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेकडे देण्यात आले. सुरवातीच्या काळात संस्थेकडून देखील स्मारकाकडे दुर्लक्ष झाले. केवळ प्रशिक्षण घेणे आणि स्मारकावर करोडो रूपये खर्च करण्यातच लक्ष देण्यात आले. आता याच संस्थेने समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा जोमाने काम हाती घेण्यात आले आहे. याकरीता समाजकल्याण विभागाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला करोडो रूपये मंजूर केले आहेत. संस्थेने दुरूस्तीचा आराखडा तयार करून जवळपास २ कोटी ३७ लाख रूपये शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग महाडकडे वर्ग केले आहेत. मात्र दहा महिने होत आले तरी अद्याप अनेक कामांच्या निवीदा काढण्यात आलेल्या नसल्याने स्मारकाची दुरूस्ती रखडली आहे.
ही आहेत दुरूस्तीची कामे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने तयार केलेल्या आराखडयामध्ये स्मारकाच्या बाहेरील भिंतीस रंगकाम करणे, वस्तूसंग्रहालयाची दुरूस्ती करणे, नवीन घुमट बसवणे, स्मारकातील किचन डायनींग हॉल , टेरेसवरील स्टोअर रूम , नाटयगृहाच्या इमारत आदींची दुरूस्ती करण्यात येणार आहे. नाटयगृहासमोर अल्पोपहार गृह, बुक स्टॉल , स्मारकाजवळ कमाण उभारणे, पार्कींग आणि रॅम्पची दुरूस्ती, बगीचा दुरूस्त करणे, दोन बोअरवेल करणे, सुरक्षा रक्षक खोलीचे बांधकाम करणे, कार्यालय कक्षाची दुरूस्ती करणे, आदी कामे समावीष्ठ करण्यात आली आहेत. महाडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ दोन बोअरवेल मारणे, आणि तरणतलावाची दुरूस्ती केली आहे. इतर कामांच्या निवीदा अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत.
प्रतिक्रिया
महाडमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने स्मारकासाठी पैसे दिले आहेत मात्र मध्यतंरीच्या काळात जी.एस.टी.मुळे निवीदा काढता आल्या नाहीत. लवकरच निवीदा काढून काम मार्गी लावले जाईल. ( संजय पाटील उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग महाड)