ओखी च्या पावसाने कडधान्य आणि भात धोक्यात
महाड ( निलेश पवार) : देशात उद्भवलेल्या ओखी चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर दोन दिवसांपासून पाउस पडत आहे. अवेळीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातात असलेले भात आणि कडधान्य पीक धोक्यात आले आहे. पावसाची कल्पना नसलेले शेतकरी मळणीच्या कामात व्यस्त आहेत. मळणीसाठी रचून ठेवलेले भाताचे भारे भिजून गेले आहेत.
महाड तालुक्यात सोमवार आणि मंगळावर या दोन दिवशी महाड तालुक्यात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. या पावसाने मळणीसाठी रचून ठेवलेले भाताचे भारे भिजून गेले आहेत. पाऊस येईल याची कल्पना नसलेले शेतकरी भात मळणीच्या कामात व्यस्त असतानाच, अचानक आलेल्या पावसाने नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी भात मळणी ची कामे आजही सुरु आहेत तर अनेक ठिकाणी भात कापलेल्या शेतात कडधान्य लागवड काम सुरु आहे. कांही ठिकाणी कडधान्य रुजू देखील लागले आहे. रुजलेल्या कडधान्यावर हा पाऊस दोन दिवसापेक्षा अधिक दिवस राहिल्यास या कडधान्याचे मोठे नुकसान होऊ शकते अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
….तरीही शाळा भरल्या.
ओखीचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहिर केली हेाती. कोकण किनारपट्टीवर या वादळाचा तडाखा बसणार होता. त्यामुळे ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी जाहिर केला. मात्र या निर्णयानंतरही महाड तालुक्यातील बहुतांश शाळा बंद होत्या तर कांही खाजगी शाळा सुरूच ठेवण्यात आल्या होत्या. आपत्कालीन स्थितीत लहान मुलांवर कोणता प्रसंग येऊ नये यामुळे शासनाने सकारात्मक घेतलेला निर्णय योग्य असताना देखील कांही शाळा सुरु ठेवण्यात आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. शासनाचा निर्णय धाब्यावर बसवणा- या शाळांवर कडक करवाई करण्याची मागणी होत आहे.