डोंबिवली , 23 नोव्हेंबर (प्रतिनिधी):
ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा ऐतिहासिक विजयाची नोंद झाली. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्ष यांच्या महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना सलग दुसऱ्यांदा निवडून देत कल्याण पश्चिमेतील मतदारांनी राजकारणात नवा अध्याय रचला आहे.
थोड्या नव्हे, तब्बल 42,454 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत विश्वनाथ भोईर यांनी आपली ताकद सिद्ध केली. “कल्याणच्या जनतेने विकासासाठी महायुतीच्या पाठिंबा कायम ठेवला असून, हा विजय जनतेच्या विश्वासाचा आहे,” असे विजयानंतर भोईर यांनी नम्रपणे व्यक्त केले.
सलग दुसऱ्यांदा विजयाने कल्याण पश्चिमेत इतिहास
कल्याण पश्चिम मतदारसंघाचा मागील तीन विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहता, प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी नवे प्रतिनिधी निवडण्याचा पायंडा पाडला होता. मात्र, या वेळेस मात्र कल्याणवासीयांनी विश्वनाथ भोईर यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत, नवा इतिहास घडवला आहे.
यंदा मतदानाचा टक्का 55% च्या वर गेला होता, त्यामुळे या वाढलेल्या मतांनी कोणाला फायदा होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि महायुतीतील पक्षांचे एकत्रित प्रयत्न यामुळे महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना मोठा विजय मिळाला.
मतांची अंतिम आकडेवारी
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भोईर यांनी आपली आघाडी कायम राखली. त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठ्या फरकाने विजय मिळवत, त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले.
विश्वनाथ भोईर (महायुती): 1,26,020 मते
सचिन बासरे (महाविकास आघाडी): 83,566 मते
उल्हास भोईर (मनसे): 22,114 मते
नेत्यांचे पाठबळ ठरले निर्णायक
माजी आमदार नरेंद्र पवार, वरुण पाटील आणि शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे महायुतीचा आधार मजबूत राहिला. “नेत्यांनी एकत्रित भूमिका घेतल्याने मतांचे विभाजन टळले आणि विजयाची व्याप्ती अधिक झाली,” असे भोईर यांनी स्पष्ट केले.
महायुतीत जल्लोषाचा माहोल
भोईर यांच्या ऐतिहासिक विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे, गुलाल आणि फटाक्यांच्या आवाजात जल्लोष केला. “विकासाच्या प्रवाहासाठी कल्याण पश्चिमच्या जनतेने दिलेला पाठिंबा कायम राहील,” असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला.
कल्याण पश्चिमेतील या ऐतिहासिक विजयामुळे महायुतीच्या नेतृत्वाखालील विकासाचा मार्ग अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
——-