कल्याण कोर्टातील दिवाणी वकील संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी – सदस्यांची घेतली भेट

कल्याण : ता :18 (प्रतिनिधी ):
कल्याण कोर्टातील वकीलांच्या ज्या काही मागण्या असतील त्या सर्व पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी आपण पूर्णपणे प्रयत्न करू असे ठाम आश्वासन कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी विश्वनाथ भोईर आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज कल्याण कोर्टातलील दिवाणी वकील संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी आणि सदस्यांची भेट घेतली.

या बैठकीत भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी पुन्हा एकदा शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे सरकार येण्यासाठी कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. तर यावेळी उपस्थित वकील संघटनेच्या पदाधिकारी आणि इतर वकिलांनी आपल्या विविध मागण्या आणि मुद्दे मांडत ते सोडवण्याची विनंती केली.

या मागण्यांमध्ये कल्याण कोर्टाच्या जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतीच्या जागेवर नविन इमारत बांधणे, उच्च शिक्षित बेरोजगारांच्या स्टायपेंडच्या धर्तीवर ज्युनिअर वकिलांनाही स्टायपेंड मिळावा, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही वकिलांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कडक शिक्षेची तरतूद असणारा कायदा पारीत करावा या प्रमूख मुद्द्यांचा समावेश होता. तर यापैकी कल्याण कोर्टाची नविन इमारत बांधण्याबाबत आपण यापूर्वीच विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले असून उर्वरित प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिले.

या बैठकीला कल्याण वकील संघटना (दिवाणी) चे अध्यक्ष ॲड. सुदेश गायकवाड, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश रासकर ,खजिनदार ॲड. जयदीप हजारे , सह सचिव ॲड. रोहित झुंझारराव, सह-खजिनदार ॲड.राजू भोईर, ज्येष्ठ वकील ॲड. सुरेश पटवर्धन, ॲड. रघुनाथ कर्णिक, ॲड. प्रवीण सावंत, ॲड. सतीश अत्रे, ॲड. के. टी. जैन, ॲड. रणजित झुंझारराव, ॲड. तुषार तोंडापुरकर, ॲड. सुधा जोशी त्याच प्रमाणे ॲड. अजिंक्य परांजपे, ॲड. विकास भुंडरे, ॲड. समृध्द ताडमारे, ॲड. शशिकांत पाटील, ॲड. गुरुनाथ भूंडरे व इतर वकील सभासद उपस्थित होते.

——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!