मुंबई  : मुख्यमंत्री  लाडकी बहीण योजनेतुन राज्यसरकारकडून महिलांना दीड हजार रुपये देणार आहेत. या योजनेवर विरोधकांकडून जोरदार टीका केली  जात आहे. मात्र आता या योजनेवर केलेल्या प्रसिद्धीवरून  विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवर यांनी महायुती सरकारवर  निशाणा साधला आहे. महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच 270 कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारसाठी तब्बल 199 कोटी 81 लाख खर्च केला जाणार आहे”, अशा आशयाचे ट्वीट काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. शासन निर्णय ट्वीटरवर पोस्ट करत वडेट्टीवारांनी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चावर काही सवाल केले आहेत.

जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हफ्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र 199 कोटी 81 लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले.  महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच 270 कोटींचा जीआर काढला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारसाठी तब्बल 199 कोटी 81 लाख खर्च केला जाणार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, विशेष म्हणजे 15 ऑगस्ट सुट्टीचा दिवस असताना हा जीआर काढण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी तर सोडा, कामकाजाच्या दिवशी सुद्धा मंत्रालयात जनतेची कामे होत नाही. दुसरीकडे मात्र महायुतीत शामिल पक्षांच्या हिताचे सरकारी निर्णय घेण्यासाठी 15 ऑगस्टचा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि शासकीय यंत्रणा सोडत नाही. स्वतःच्या हितासाठी राबणारे किती हे तत्पर सरकार असेच म्हणावे लागेल.

ह्या सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाही, पण स्वतःची बढाई करण्यासाठी जाहिरातीसाठी मात्र भरमसाठ खर्च सुरू आहे. दिल्लीत बसलेल्या सरदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवला आहे, येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाही, अशी टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *