नारायण राणेंचा नवा स्वाभिमान पक्ष ?
मुंबई : काँग्रेसला रामराम ठोकून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे स्वतंत्र पक्ष काढणार असल्याचे बोलेले जात आहे. येत्या १ ऑक्टोबरला मुंबईत राणे नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याचे समजते. त्यामुळे राणेंच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.
राणेंचे पूत्र नितेश राणे यांची स्वाभिमान संघटना आहे. स्वाभिमान संघटनेचा विस्तार कोकणासह मुंबई व महाराष्ट्रातील काही भागात झालेला आहे. या संघटनेच्या माध्यमातूनच राणे नवीन पक्ष काढणार असल्याचे बोलले जाते. राणेंचा हा नवा पक्ष सरकारमध्ये सामील होईल त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात राणेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकेल असे अनेक राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. दसऱ्यापर्यंत आपली पुढची राजकीय दिशा जाहीर करू असे राणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होत. त्यानंतर मागील आठवडयात राणेंनी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. पण या भेटीत राणेंच्या भाजप प्रवेशावर फार काही चर्चा झाली नाही. त्यामुळेच राणेंनी नवा पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सुत्रांकडून समजते.
——